पुणे : अवैध धंद्यांना (Illegal) प्रोत्साहन देत असल्याचा ठपका ठेवून एका पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. वरिष्ठ निरीक्षकांच्या नावाने संबंधित पोलीस कर्मचारी वसुली करत होता. सिंहगड रोड पोलीस (Sinhagad police) ठाण्यातील हा कर्मचारी असून आता त्याच्यावर आता कारवाई करण्यात आली आहे. श्रीधर पाटील असे निलंबित (Suspended) केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसुली न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर या कर्मचाऱ्याने वरिष्ठ निरीक्षकांसोबत वादही घातल्याचे समोर आले आहे. तर या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. श्रीधर पाटील हा कर्मचारी अवैध धंद्याचे पैसे गोळा करत होता.
श्रीधर पाटील यास वरिष्ठ निरीक्षकांनी वसुली बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्यानंतरही त्याच्यामध्ये कोणताही बदल झाला नव्हता. हे प्रकरण वरिष्ठांपर्यंत गेले होते. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांना यासंबंधीच्या बाबी समजल्या होत्या. त्यानंतर पोलीस निरीक्षकांना बोलावून घेण्यात आले होते. दरम्यान, प्राथमिक चौकशीच्या अधीन राहून पाटील यांना निलंबित करण्यात येत असल्याचे उपायुक्त गायकवाड यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.