पुणे : पुणे पोलिसांनी पूजा चव्हाण (Pooja Chavan Suicide) आत्महत्याप्रकरणात अरुण राठोड (Arun Rathod) याला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी (Pune Police) आज गुरुवारी 18 फेब्रुवारीला अरुणला ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येत आहे. पूजाने 7 फेब्रुवारीला रात्री दीडच्या सुमारास आत्महत्या केली होती. त्यानंतर ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या, त्यामध्ये कथित मंत्री आणि अरुण राठोड यांची नावं होती. मात्र अरुण राठोड गायब होता, त्याला अखेर पोलिसांनी पकडलं आहे. (Pooja Rathod Abortion to Pooja Chavan suicide who is Arun Rathod)
अरुणला पकडताना पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली. अरुण राठोडची चौकशी थेट पुणे पोलीस आयुक्तालयात होण्याची शक्यता आहे.
अरुण राठोडच्या नावाने व्हायरल रेकॉर्डिंगचा अहवालात उल्लेख आहे. यवतमाळ प्रकरणातही अरुण राठोड नामक व्यक्ती असल्यानं संशय बळावला. पोलीस अहवालात विजय चव्हाणहीसोबत असल्याचा उल्लेख आहे.
नुकतंच पूजा अरुण राठोड या तरुणीच्या गर्भपाताचा अहवाल समोर आला होता. या प्रकरणातही अरुण राठोड हे नाव होतं. त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्या आणि पूजा राठोड गर्भपात या दोन्हीतील समान धागा होता तो म्हणजे अरुण राठोड. आता यालाच ताब्यात घेतल्याने पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील गुंता सुटण्याची आशा आहे.
अरुण राठोड हा मूळचा बीड जिल्ह्यातील परळीचा रहिवासी आहे. परळीच्या दारावती तांडा इथं त्याचं घर आहे. तो शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जातं. तो संजय राठोड यांच्या अत्यंत जवळचा असून राठोड यांच्या सर्व खासगी गोष्टी अरुणला माहीत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. संजय राठोड यांच्या घरी, कार्यालयात आणि मंत्रालयातही अरुणचा मुक्त संचार असल्याने तो मंत्र्याचा किती जवळचा आहे, हे दिसून येतं.
अरुण राठोड हा पुण्यात पूजा चव्हाणसोबत राहत होता. पूजाला काय हवं नको ते देण्याचं काम त्याच्याकडे होतं असं सांगितलं जातं. पूजाच्या राहण्याची व्यवस्था मंत्रिमहोदयांनी अरुण राठोड याच्याकडे सोपवल्याची प्राथमिक माहिती आहे. अरुण राठोड आणि पूजा चव्हाण यांचे नात्याने कोणतेही रिलेशन नसल्याचं सांगितलं जातं. पण पूजा अरुण राठोडचा गर्भपात झाल्याने, हा तोच अरुण राठोड आहे का हा नव्याने पडलेला प्रश्न आहे.
दरम्यान, काल पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला होता. पूजा अरुण राठोड नावाच्या तरुणीचा यवतमाळच्या रुग्णालयात गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. त्यामुळे ही पूजा अरुण राठोड कोण? पूजा अरुण राठोड हिचा पूजा चव्हाणशी काय संबंध? पूजा अरुण राठोड हीच पूजा चव्हाण आहे का? कथित मंत्र्याने आपल्या जिल्ह्यातील रुग्णालयात हा गर्भपात घडवून आणलाय का? असे अनेक प्रश्न उपस्थित राहिले.
दरम्यान, पूजा चव्हाणसोबत अरुण राठोड राहात होता. तर पूजा अरुण राठोडने गर्भपात केला, त्यामध्येही अरुण राठोडचं नाव आहे. त्यामुळे दोन्ही पूजा आणि दोन्ही अरुण राठोड एकच आहेत का, याचा तपास आता पोलीस करतील.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अरुण राठोडचं नाव आलं आहे. हा अरुण राठोड बीडचा असून वन मंत्री संजय राठोड यांचा कार्यकर्ता असल्याचं सांगण्यात येत आहे. तर यवतमाळमधील अरुण राठोड याचा पत्ता शिवाजी नगर, नांदेड असा दाखवण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही प्रकरणातील अरुण राठोड एकच आहेत की दोन्ही वेगळे आहेत? असा सवाल निर्माण झाला आहे.
परळीत राहून भाजपमध्ये दोन वर्षे काम केल्यानंतर पूजा चव्हाण ही संजय राठोड यांच्या संपर्कात आल्याचे सांगितले जाते. संजय राठोड हे शिवसेनेच्या विदर्भातील बड्या नेत्यांपैकी एक आहेत. राठोड यांच्या संपर्कात आल्यानंतर पूजा चव्हाण हिचे कर्तृत्त्व आणखी उजळले. याच काळात ती यशाच्या अनेक पायऱ्या चढत वर गेली. राठोड यांनी पूजाची सर्व जबाबदारी अरुणकडे सोपवली होती. पूजाला मॉडेलिंग करायची होती. त्यात अरुण तिला मदत करत होता. त्यामुळे हे दोघेही पुण्यात एकत्र राहू लागल्याचं सूत्रांनी सांगितलं.
अरुण राठोड याचा पूजाशी काहीही संबंध नव्हता. तो पूजाचा नातेवाईक नव्हता. पण बाहेर वावरताना पूजाचा चुलत भाऊ असल्याचं तो सांगायचा. पूजाला एकूण सहा बहिणी आहेत. पूजा ही पाचवी आहे. तिच्या चारही बहिणींचं लग्न झालेलं आहे. तिला भाऊ नाही. मात्र, व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये अरुण हा पोलिसांना तो पूजाचा चुलत भाऊ असल्याचं सांगत असल्याचं ऐकायला मिळतं.
अरुण आणि संजय राठोड यांच्या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. अरुण राठोड हा पूजा चव्हाणसोबत राहात होता. एव्हाना तिची जबाबदारी अरुणवरच होती. पूजा थोडी सर्किट आहे म्हणजे हट्टी आहे. ती ऐकणार नाही, असं अरुण मंत्र्याला सांगतो. यावरून पूजाने एकदा निर्णय घेतला तर ती मागे हटत नाही, हे त्याला माहीत असल्याचं स्पष्ट होतं. तसेच पूजासोबत त्याची पूर्वीपासूनच ओळख असावी असाही अंदाज या क्लिपमधील संभाषण ऐकल्यावर येतो.
पूजा चव्हाणने आत्महत्या केल्यानंतर एकूण 12 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यात अरुण चव्हाण आणि कथित मंत्र्याचं कथित संभाषण होतं. त्यात पूजाच्या उपचाराबाबत दोघांनीही चर्चा केली होती. ट्रिटमेंट घेतल्यानंतर आत्महत्या करणार असल्याचं पूजाने या अरुणला सांगितलं होतं. तसेच पूजाने एक किट आणून काही तपासणी केली होती. ती किट पॉझिटिव्ह आल्यानंतर अरुण घाबरला होता. त्यामुळे पूजावर नेमका कोणता उपचार सुरू होता? अरुण का घाबरला होता? असा असा सवालही केला जात आहे.
मूळ परळीच्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती भावासोबत पुण्यात रहात होती. तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा आरोप आहे.
संबंधित बातम्या
पूजा राठोडचा गर्भपात ते पूजा चव्हाणची आत्महत्या, यवतमाळ ते पुणे 45 तासांचा घटनाक्रम
पूजा अरुण राठोड कोण?, मेडिकल रिपोर्ट काय सांगतो?, नांदेडशी कनेक्शन काय?; वाचा सविस्तर रिपोर्ट!