राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशात पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. राज्याचे माजी मंत्री आणि इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे विरूद्ध माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्यात लढत होणार आहे. अजित पवार भाजपसोबत गेल्याने हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. या दोन नेत्यांमध्ये तगडी लढत होणार आहे. अशातच एक युवा चेहरा इंदापूरमधून लढण्यास इच्छुक आहे. त्यामुळे इंदापूरमध्ये यंदा तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
सोनाई दूध संघाचे प्रविण माने हे इंदापूर विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या ऐवजी आपल्याला उमेदवारी द्या, अशी मागणी माने यांनी शरद पवारांकडे केली होती. मात्र ती मागणी मान्य न झाल्याने ते आता अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. आजच प्रविण माने यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिलेत.
इंदापूरमध्ये भाषण करताना प्रवीण माने यांना अश्रू अनावर झाले. महाराष्ट्राप्रमाणेच इंदापूर तालुक्यात ही विधानसभेचा धडाका सुरू आहे. सकाळी उठलो ग्रामदैवत बाबीर देवस्थानचं नतमस्तक झालो. कुटुंबातील ज्येष्ठांचं दर्शन घेऊन धाकटे पंढरपूरचे दर्शन घेतलं आणि घरी आलो. जेव्हा घरी आलो तेव्हा गाडी घरी जात नव्हते त्यावेळी डोळ्यातून टचकन पाणी आलं. एवढी जर लोक प्रेम करत असतील तर…असं म्हणत असतानाच प्रवीण माने यांच्या डोळ्यात पाणी आलं.
इंदापूर तालुक्याचा 1995 सालचा इतिहास पाहा. इंदापूर तालुक्याचा इतिहास आहे जेव्हा तिरंगी होते. जो अपक्ष उभा राहतो तेव्हा तो इंदापूर तालुक्यातून निवडून येतो हा इतिहास आहे. लोकांनी सांगितलं आहे. आता जर माघारी घेतली तर तुमचा नंबर डिलीट करून टाकू. आपल्या सर्वांच्या साक्षीने आशीर्वादाने थोड्या वेळात उमेदवारी अर्ज भरणार आहे. परिवर्तनाच्या लढाईत समोर बसलेला प्रत्येक माणूस आमदार आहे लक्षात ठेवा मी एकटा आमदार होणार नाही, असं प्रविण माने म्हणाले.