Pune Sinhagad : पुण्यातल्या सिंहगड किल्ला घाट रस्त्यावर बसवण्यात येणार संरक्षक जाळी; 10 किमी रस्त्याचं झालं सर्वेक्षण
पीडब्ल्यूडी आणि वनविभाग सुरक्षेकडे पुरेसे लक्ष देत नसल्यामुळे या परिसरात वारंवार येणारे तसेच येथील रहिवासी नाराज आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करायला हवे होते, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
पुणे : सिंहगड किल्ला घाट विभागात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्यालगतच्या डोंगरउतारांवर संरक्षक जाळी (Protective mesh) बसवण्यात येणार आहे. पुणे वनविभागांतर्गत रस्त्याच्या सुरक्षेसाठी दीड कोटी रुपये देण्यात आले होते, असे पुणे येथील परिक्षेत्र वन अधिकारी प्रदीप संकपाळ यांनी सांगितले. पुणे वनविभागाला हे काम करण्यास परवानगी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. IIT, मुंबईच्या तज्ज्ञांच्या पथकाने काही वर्षांपूर्वी किल्ल्याच्या पायथ्यापासून ते पार्किंग झोनपर्यंतच्या 10 किमी रस्त्याचे तपशीलवार सर्वेक्षण केले होते. याने मार्गावरील 12 असुरक्षित ठिकाणे (Vulnerable spots) ओळखली होती. त्यांच्या सूचनांनुसार घाट विभागात चार ठिकाणी जाळ्या बसवण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अधिकाऱ्याने सांगितले. संबंधित विभागाने असुरक्षित जागा ओळखल्या आहेत. खडकाचा प्रकार वेगळा असल्याने, आयआयटी, मुंबईच्या तज्ज्ञांची एक टीम नवीन तपासणी करेल. त्यांच्या सूचनांनुसार निर्णय घेण्यात येणार आहे.
खबरदारीचा उपाय
कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी सर्व आवश्यक खबरदारीच्या उपाययोजनादेखील करण्यात येणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) बससेवा बंद केल्यानंतर आता पर्यटक त्यांच्या वाहनाने किल्ल्यावर जात आहेत. पावसाळ्यापूर्वी संरक्षक जाळ्या बसवल्या नाहीत तर घाटात मोकळी माती, दगडे वाहनांवर पडण्याची शक्यता जास्त असते. याआधीही अनेकवेळा ऐन रस्त्यावर मोठमोठे दगड कोसळल्याचे प्रकार घडले आहे. यामुळे मोठी दुर्घटना घडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. विशेषत: पावसाळ्यात अशा घटनांमुळे अनेकवेळा हा रस्ता बंद करावा लागतो.
‘पावसाळ्यापूर्वी पूर्ण करायला हवे होते काम’
पीडब्ल्यूडी आणि वनविभाग सुरक्षेकडे पुरेसे लक्ष देत नसल्यामुळे या परिसरात वारंवार येणारे तसेच येथील रहिवासी नाराज आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करायला हवे होते, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आणि अनोखे निसर्गसौंदर्य आहे. त्यामुळे अनेक पर्यटक नियमितपणे गडावर येतात. याकडे जिल्हा प्रशासनाने पुरेसे लक्ष दिलेले नाही, असे येथे येणाऱ्या पर्यटकांचे म्हणणे आहे.