MPSC चे विद्यार्थी रात्रीपासून रस्त्यावर, सरकारकडून विद्यार्थ्यांची फसवणूक, जितेंद्र आव्हाड यांचा इशारा काय?
MPSC Student Protest in Pune : पुण्यात कालपासून सुरु झालेलं एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आमरण उपोषण आजही सुरुच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
प्रदीप कापसे, पुणे : पुण्यात आज सलग दुसऱ्या दिवशीही MPSC विद्यार्थ्यांचं (MPSC Student) आंदोलन सुरुच आहे. काल रात्रीपासून आपल्या मागणीसाठी हे विद्यार्थी आमरण उपोषणासाठी बसले आहेत.परीक्षा पद्धतीची नवी प्रणाली २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय जाहीर करा, अशी प्रमुख मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. सरकारने यासंबंधीचा निर्णय दिला आहे. मात्र तसा जीआर आलेला नाही, असा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. पुण्यातील बाल गंधर्व चौकात विद्यार्थ्यांनी कालपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. काल रात्रभर हे विद्यार्थी आंदोलन स्थळी होते. मात्र अद्याप त्यांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नाही.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पाठिंबा
MPSC विद्यार्थ्यांची ही मागणी रास्त असून आम्ही विद्या्र्थ्यांच्या पाठिशी आहोत, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने घेतली आहे. काल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आंदोलन स्थळाला भेट दिली. तर नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी हजेरी लावली.जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, आणि विद्यार्थ्यांसोबतचं आंदोलनात बसून राहणार अशी भूमिका ठोंबरेंनी घेतलीय. आंदोलना दरम्यान ईश्वर अल्ला तेरे नाम, शिंदे फडणवीस को सद्बुद्धी दे भगवान असा जप रुपाली ठोंबरे पाटलांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसोबत केला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार संग्राम थोपटे यांनीही आंदोलनाला हजेरी लावत पाठिंबा दर्शवला.यावेळी एमपीएससी तरुणांच्या भविष्याबद्दल सरकार खेळतेय. दुसरा अभ्यासक्रम आणून त्यांचं आयुष्य खराब करतेय,असा आरोप नाना पटोले यांनी केलाय.
मी आंदोलन करणाऱ्या #mpsc विद्यार्थ्यांना उघड़ पठींबा देतो त्यांची फ़सवनूक झाली सरकारनी आश्वासन देउन पाठ फिरवली महाराष्ट्र लोक सेवा आयोगा च्या अभ्यस्क्रमा बाबतीत @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks pic.twitter.com/QXip1WuMRU
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 20, 2023
जितेंद्र आव्हाड यांचा इशारा काय?
सरकारने विद्यार्थ्यांना आश्वासन दिलंय. २-२५ पर्यंत नवीन अभ्यासक्रम लागू होईल. याबद्दल कोणतंही सरकारी परीपत्रक आहे. विद्यार्थ्यांना आश्वासन द्यायचं, जयजयकार करून घ्यायचा, हे बरोबर नाही. कोणत्याही क्रांतीची सुरुवात नेहमी विद्यार्थी करतात, हा जगाचा इतिहास आहे. रात्रभर विद्यार्थी बाहेर बसलेत. ती एक पिढी आहे. त्यांचं नुकसान महाराष्ट्राला परवडणारं नाही, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय.