पुणे अपघात प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांनी पैसे घेतले का? अजित पवारांचं धंगेकरांच्या आरोपाला प्रत्युत्तर
पुणे अपघात प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार पहिल्यांदाच कॅमेरासमोर बोलले. यावेळी त्यांनी या प्रकरणावर बारिक लक्ष असल्याचं सांगितलं. तर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सीपींवर केलेल्या आरोपालाही उत्तर दिलं.
पुण्यातील कोरेगाव पार्कमधील कल्याणीनगर येथे ‘हिट अँड रन’ प्रकरणामध्ये कोर्टाने आरोपींना 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या अपघातामध्ये विरोधकांनी पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह ठेवलं होतं. अपघात प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी एफआयआरमध्ये अशी कलमे लावलीत ज्यामुळे केस कोर्टात चालणार नाही. इतकंच नाहीतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीच पैसे घेतल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला होता. अशातच यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी धंगेकरांच्या या आरोपाला प्रत्युत्तर दिलं आहे.
अजित पवार काय म्हणाले?
रवींद्र धंगेकर म्हणाले पुणे पोलीस आयुक्तांनी पैसे घेतले. अशा पद्धतीने कोणीही बिनबुडाचे आरोप केले असतील तर त्यांना पुरावे द्यावे लागतील. उगीच जीभ लावली टाळ्याला असं बोलता येत नाही, असं अजित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी इंदापूर तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यावरही भाष्य केलं. इंदापूरमध्ये तहसीलदारांवर हल्ला झाला, मला बातमी कळाल्यावर सीपींना सांगितलं कोणताही हयगय करू नका. ज्यांनी कोणी हल्ला केला आहे, त्यांच्यावर सक्त कारवाई करा. मी विचारलं हल्लेखोर कोण होते? तर वाळू धंद्यातीलच होते, म्हटलं मग ही वाळू माफिया गँग दिसत आहे तुम्ही करा कारवाई, असं अजित पवारांनी सांगितलं.
पुण्यातील घटनेवर अजित पवार काय बोलले?
पुण्यामध्ये मधल्या काळामध्ये घटना घडल्या. 20 तारखेला आपलं मतदान मुंबईचे शेवटचं होतं. मी 21 तारखेला 22 तारखेला दोन्ही दिवस सकाळी नऊ वाजल्यापासून मंत्रालयामध्ये होतो. या सगळ्या घटनेच्या संदर्भामध्ये मी लक्ष ठेवून होतो. माझं त्या दिवशी देवेंद्र फडणवीसांसोबत बोलणं झालं. ते म्हणले मी तातडीने पुण्याला निघालो. त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष घालून स्वतः प्रेस घेतली. कारण नसताना एक अशा प्रकारचा गैरसमज समाजामध्ये करून दिला जातो की याच्यात पालकमंत्र्यांच्या लक्षणे कोणी लक्ष घातलं नाही. मला मीडियाच्या पुढे यायला आवडत नाही. मीडियाच्या अनेक लोकांना माहिती आहे, मी माझं काम करत असतो, असं अजित पवार म्हणाले.
आज पण सकाळी सीपी आणि मी दोघांनी त्याच्याबद्दलची चर्चा केली. त्यांनी प्रत्येक मिनिट टू मिनिट कसा कसे काय काय घडत गेलं ते सांगितलं. यामध्ये बेल कसा मिळाला हेही तुम्हाला त्या ठिकाणी कळालंय त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या बातम्या आल्या आता बेल न्यायालयाने काय द्यावा न्यायालयाचा प्रश्न आहे. पुर्ण पारदर्शक पद्धतीने काम झाल्याचे अजित पवारांनी सांगितलं.