पुणे कोरेगाव पार्क येथील कल्याणीनगर येथील अपघात प्रकरण आणखी चिघळत चाललं आहे. बिल्डरच्या मुलाला बाल हक्क न्यायालयाने 14 दिवसांसाठी बालसुधारगृहामध्ये पाठवलं आहे. त्याचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. यादरम्यान सोशल मीडियावर एका रॅप साँगने वातावरण तापवलं होतं. या व्हिडीओतील तरुण अर्वाच्च भाषेत बोलताना दिसला. इतकंच नाहीतर शिवीगाळही करतोय. तो कारमध्ये बसलेला असून अल्पवयीन असल्याचं दिसत आहे. त्यामुळे तो व्हिडीओमधील तरूण बिल्डरचा मुलगा असल्याचं समजून नेटकऱ्यांनी त्याला धारेवर धरलं. अशातच यावर मुलाची आई शिवानी अग्रवाल यांनी आपली प्रतिक्रिया देत ते रॅप साँग वेदांतचं नसल्याचं म्हटलं आहे.
माझी मीडियाला विनंती आहे की रॅप साँगचा जो व्हिडीओ व्हायरल होत आहे तो माझ्या मुलाचा नसून तो फेक आहे. माझा मुलगा बाल सुधार कारागृहात असल्याचं शिवानी अग्रवाल सांगत आहेत. त्यासोबतच प्लीज माझ्या मुलाला वाचवा अशी विनंतीही शिवानी अग्रवाल यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं रॅप साँग अपघातातील अल्पवयीन मुलाचं असल्याचा दावा केला. त्यामुळे लोकांचा वेदांतबद्दलचा रोष आणखी वाढला. कारण दोन जणांचा जीव घेऊनही त्याला अजिबात पश्चाताप नसल्याचं अनेकांनी सोशल मीडियावर कमेंट करत म्हटलं. मात्र काही वेळाने तो व्हिडीओ फेक असल्याचं समोर आलं. लोकांच्या मनात गैरसमज होऊ नयेत म्हणून मुलाची याची आई कॅमेरासमोर आली आणि तो व्हिडीओ आपल्या मुलाचा नसल्याचं सांगितलं.
दरम्यान, पोलिसांनी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल, आजोबा सुरेंद्र अग्रवाल आणि ड्रायव्हर यांची एकत्र चौकशी केली. यावेळी ड्रायव्हर याने मोठा खुलासा केला की, मुलाला गाडी चालवण्यासाठी दे असा फोन त्याच्या वडिलांनी म्हणजेच विशाल अग्रवाल यांनी केला.