आमदार अपात्रता निकालाच्या दोन शक्यता काय?; सर्वात मोठा दावा कुणी केला?
Adv Asim Sarode on Shivsena MLA Disqualification Case Hearing Today : वकील म्हणून 'हा' प्रश्न मला पडतोय; आमदार अपात्रतेच्या निकालाआधी असिम सरोदे यांचा थेट सवाल. फेसबुक पोस्ट लिहित असिम सरोदे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते नेमकं काय म्हणालेत? वाचा सविस्तर...
योगेश बोरसे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, पुणे | 10 जानेवारी 2024 : शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा आज निकाल आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दुपारी चार वाजता निकालाचं वाचन करणार आहेत. हा निकाल यायला अवघे काही तास उरले आहेत. अशातच अॅड असिम सरोदे यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. पात्रतेबाबत काय निर्णय होणार? असा प्रश्न सर्वांना आहे मात्र आज निर्णय होणार का?, असा सवाल असिम सरोदे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत. तसंच या निकाला बाबतच्या दोन शक्यताही त्यांनी सांगितल्या आहेत.
दोन शक्यता काय?
अपात्रतेच्या बाबतीत निकालाच्या दोनच शक्यता आहेत. एक कायदेशीर आणि दुसरी बेकायदेशीर…तरीही प्राधान्यक्रमाने पहिली शक्यता आहे की, बेकायदेशीर निर्णय येईल. एकनाथ शिंदे यांच्यासह सगळ्या आमदारांना पात्र ठरवलं जाईल.दुसरी शक्यता कायद्याच्या चौकटीत बसणारी आहे ती म्हणजे शिंदेंसह सगळे अपात्र ठरतील, असं असिम सरोदे म्हणालेत.
असिम सरोदे यांची पोस्ट
अपात्रतेबाबत काय निर्णय होणार? असा प्रश्न सर्वांना आहे मात्र आज निर्णय होणार का? असा प्रश्न मला पडतोय कारण अजूनही प्रकरणातील वकील म्हणून मला किंवा इतर वकिलांना Maharashtra Legislative Assembly सचिव यांच्याकडून इमेल आलेली नाही की राहुल नार्वेकर किती वाजता निर्णय जाहीर करणार?
कदाचित अगदी वेळेआधी कळतील की किती वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात जमायचे आहे? पण जर 400 ते 500 पानांचा निर्णय तयार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज निर्णय देणे आवश्यक आहेच तर किती वाजता निर्णय जाहीर करणार हे कळवायला इतका उशीर का??
आज आमदार अपात्रतेचा निकाल
राज्याच्या राजकारणावर मोठा परिणाम होणारा आजचा दिवस आहे. कारण शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आज निकाल लागतो आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून आज आमदार अपात्रतेचा निकाल दिला जाणार आहे. दुपारी चार वाजता निकालाच्या वाचनाला सुरुवात होणार आहे. हा निकाल सहा भागात दिला जाणार आहे. एकूण 34 याचिकांबाबतचा हा निकाल आहे.
निकाला आधी घडामोडींना वेग
आज शिवसेना आमदार अपात्रतेबाबतचा निकाल येणार आहे. या निकाला आधी हालचाली वाढल्या आहेत. आज सकाळी 10 वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत काय होतं याकडे राज्याचं लक्ष आहे. तर काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी जात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी जाऊन भेट घेतली. आज येणाऱ्या निकालाकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष आहे.