पुणे | 10 सप्टेंबर 2023 : पुणे येथील पुरंदरमध्ये सुरु होणाऱ्या नवीन विमानतळाची चर्चा सुरु आहे. त्याचवेळी लोहगाव विमानतळावर विविध सुविधा सुरु केल्या गेल्या आहेत. लोहगाव विमानतळावर रन वे लायटिंगचे काम केले गेले आहे. यामुळे लोहगाव विमानतळावरून २४ तास विमानवाहतूक शक्य झाली आहे. तसेच पुणे विमानतळावर सुरु असलेले नवीन टर्मिनलचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या विमानतळावर ऑक्टोंबरमध्ये नवीन टर्मिनल सुरु होणार आहे.
पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलची चाचणी यशस्वी झाली आहे. यामुळे ऑक्टोंबर 2023 पासून हे विमानतळ सुरु होण्याची शक्यता आहे. पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलसंदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडूनही वेळोवेळी माहिती घेतली जात आहे. तसेच सर्व विमान कंपन्यांच्या एअरलाईनची बैठक घेतली. या बैठकीत आठ दिवसांत नवीन टर्मिनलला ऑफिस शिफ्ट करण्याचे सांगण्यात आले. ऑक्टोंबर महिन्यापर्यंत हे टर्मिनल सुरु करण्यासंदर्भात सर्व हालचाली सध्या सुरु आहेत.
नवीन टर्मिनल सुरु करण्यासाठी 525 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. त्यात पाच एरोब्रिज केले गेले आहे. तसेच टेकऑफ आणि लॅण्डींगसंदर्भात अनेक सुविधा नव्याने विकसित केल्या गेल्या आहेत. सध्याच्या टर्मिनलवरुन 90 विमाने रोज जातात तर नवीन टर्मिनलवरुन रोज 120 विमाने जातील. तसेच रोज 32,000 ते 33,000 प्रवाशी रोज प्रवास करु शकतील.
नवीन टर्मिनल 60,000 स्केअर फुटावर उभारण्यात आले आहे. नवीन टर्मिनलच्या इमारतीवर गर्दीवर नियंत्रणासाठी सेन्सर बसवण्यात आले आहे. लगेजसंदर्भात नवीन प्रणाली तयार केली आहे. मुलांच्या खेळण्यासाठी जागा आहे आणि रेस्टॉरंटही तयार केले गेले आहे. नवीन टर्मिनलवर विमाने उतरण्यास सुरुवात झाल्यावर प्रवाशांनी त्या परिसरात जाण्यास परवानगी देण्यात येणार आहे. पुणे विमानतळावर 51 वर्षानंतर या पद्धतीचे काम केले गेले आहे. नवीन टर्मिनल सुरु झाल्यानंतरही जुन्या टर्मिनलचाही वापर करण्यात येणार आहे. यामुळे पुणे विमानतळावरुन जाणाऱ्या-येणाऱ्या विमानांची संख्या वाढणार आहे,.