पुणे : जीएसटीचे (GST) पैसे काय पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्यासाठी आलेले नाहीत. पेट्रोल-डिझेलचे भाव आम्ही पण कमी केलेत. मागच्या काळात येणारे पैसे आत्ता मिळाले आहेत. त्याचा आणि याचा काही संबंध नाही, असे रोखठोक मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले आहे. ते पुण्यात बोलत होते. राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यावरून भाजपा सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहे. या सरकारला जीएसटी आणि केंद्राचे कारण देऊन पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel price) कमी करायचे नाहीत, असा आरोप सातत्याने भाजपाकडून केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर विचारले असता त्यांनी आपले मत व्यक्त केले. विकासकामांसाठी हे जीएसटीचे पैसे आहेत. त्याचा योग्य ठिकाणीच वापर करायला हवा, असे सांगायलाही अजित पवार विसरले नाहीत.
ते पुढे म्हणाले, की जीएसटीचे अजून 15 हजार कोटी रुपये येणे बाकी आहे. हे जुने कबूल केलेले पैसे आहेत, ते टप्प्याटप्प्याने येत आहेत, राहिले लवकर द्यावेत एवढी माफक अपेक्षा आहे. एकूण 29 हजार कोटी रुपये येणे बाकी होते. त्यातील काही आत्ता आले आहेत. तर राहिलेले लवकरात लवकर केंद्राने द्यावेत, अशी अपेक्षा त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे. भाजपाच्या नेहमीच्या टीकेला प्रत्त्युत्तर देताना ते म्हणाले, की जीएसटीचे आलेले पैसे काही इंधन दरकपातीसाठी नाहीत. राज्यात इतरही अनेक समस्या आहेत. शेवटी राज्याचा गाडाही नीट चालला पाहिजे. अनेक गरजू लोक आहेत. त्यांच्या काही समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी या पैशांचा वापर करता येईल, असे ते म्हणाले.
आपणही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी केल्या. त्यावेळी साधारणपणे डिझेल 1 रुपया 45 पैसे तर पेट्रोल सरासरी 2 रुपये कमी केले. हे सर्वांना माहीत आहे, असा टोला त्यांनी भाजपाला लगावला आहे. आतातरी इंधनाचे दर राज्य सरकार कमी करेल काय, असे ट्विट भाजपाने केले होते. दरम्यान, भाजपाच्या या दुटप्पी भूमिकेवरून नेटकऱ्यांनी भाजपालाच लक्ष्य केले असून हा राज्यातील जनतेचाच पैसा असल्याचे खडसावून सांगितले आहे.