सुप्रिया सुळे अन् अमोल कोल्हेंना अजितदादांनी निवडून आणलं; रुपाली चाकणकर यांचा थेट निशाणा
Rupali Chakankar on Supriya Sule and Amol Kolhe : जितदादांना मुख्यमंत्री करायचं असेल तर...; रूपाली चाकणकर यांनी 'ते' स्वप्न बोलून दाखवलं. खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यावरही रूपाली चाकणकर यांनी टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना चाकणकर काय म्हणाल्या? वाचा...
अभिजीत पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 01 जानेवारी 2024 : अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे. सुप्रिया सुळे अन् अमोल कोल्हेंना अजितदादांनीच निवडून आणलं, असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी टीका केली. मी माझ्या नवऱ्याला आणि मुलांना सांगितलं आहे. येत्या ऑक्टोबरपर्यंत बायको आणि आईला बारामतीतच राहू द्या. त्यांना सांगितलं. एप्रिलमध्ये माझी लोकसभेची निवडणूक आहे. त्यानंतर विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे मला भेटायचं असेल तर बारामतीला यावं लागेल, असं सुप्रिया सुळे बोलल्या होत्या. त्यावर आता रुपाली चाकणकरांनी टीका केली आहे. त्या पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या.
चाकणकर काय म्हणाल्या?
आता अजितदादांवर बोलणाऱ्या दोन्ही खासदार दादांमुळेच निवडून आले आहेत. विकासाचं राजकारण हवं आहे. दादा सोबत नाही म्हणून तळ ठोकावा लागतोय. सुप्रिया ताई गेली 15 वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या आहेत. आता दादासोबत नाहीत म्हणून तुम्हाला 10 महिने बारामतीमध्ये तळ ठोकून बसावं लागणार आहे, असं रूपाली चाकणकर म्हणाल्यात. अजित पवार असताना तुम्हाला निवडणुकीच्या दिवशी आणि निकालाच्या दिवशी बारामतीत जावं लागत होतं. पण आता तसं दिसत नाही, असंही त्या म्हणाल्या.
“दादांना मुख्यमंत्री करायंचय”
भावनिक राजकारण जास्त वेळ चालत नाही. निवडणुका काहीच दिवसांवर आहेत. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महायुती विजय होईल. अजितदादांना मुख्यमंत्री होताना पाहायचं असेल तर आम्हाला काम करावं लागेल. दादांनी राज्याचं मुख्यमंत्री व्हावं, हे आमचं स्वप्न आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. दादा मुख्यमंत्री व्हावेत ही सर्वांची इच्छा आहे, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
“जो निर्णय घेतला तो योग्यच”
आजपासून नवीन वर्षाची सुरुवात होतेय. त्यामुळे रुपाली चाकणकर यांनी नवीन वर्षांच्या शुभेच्छाही दिल्या. नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा… 2023 या वर्षात आम्ही जो निर्णय घेतला तो विकासासाठी घेतला. अजितदादांनी अनेक चांगले निर्णय घेतले. 18 जानेवारीला मुंबईत महिला मेळावा आयोजित केला आहे. तृतीयपंथीयांसाठी ससूनमध्ये स्वतंत्र वॉर्ड तयार करणार आहोत, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.