Pune Ajit Pawar : मला बोलावताना दहादा विचार करा, पुण्यातल्या गोधन प्रदर्शनातल्या गोठ्यांच्या पाहणीदरम्यान अजित पवारांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान
दुधाचे भाव कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडत असते. यामध्ये सातत्य नाही. मात्र सरकारची भूमिका शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याची असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
पुणे : राजकारणात येण्यापूर्वी गाईची धार काढली. गुरे आणि त्यासंबंधीचे बारकावे आम्हाला माहीत आहेत. आपल्या मुलाप्रमाणे गोवंश लोकांनी जपला आहे. काही जण याला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वार्थासाठी हे केले जात आहे, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली. ते पुण्यात बोलत होते. अजित पवारांच्या उपस्थितीत गोधन 2022 देशी गोवंश प्रदर्शन आणि प्रात्यक्षिकांचा उद्घाटन समारंभ पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गाईच्या (Cow) गोठ्यांची पाहणी करताना अधिकाऱ्यांचे कानही त्यांनी टोचले. कृषी महाविद्यालयाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाकडून प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. राजकारणात (Politics) येण्यापूर्वी गाईची धार काढण्यापासून विविध आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. तसेच गाईचे महत्त्वही पटवून दिले. शेतकऱ्यांना यासंबंधीचे व्यावसायिक महत्त्वही त्यांनी सांगितले.
‘गाईची धारही काढली’
ते म्हणाले, की मला वर बघून छान छान म्हणायला आवडत नाही. काही गोष्टी मला सांगायला पाहिजे. राजकरणात येण्यापूर्वी मी हे सर्व केले आहे. गाईची धार काढली आहे. आम्हाला याच्यातील बारकावे माहिती आहेत. मात्र आता खूप बदल झाला आहे. देशी गाईच्या गोमूत्राला, तुपाला तसेच खव्याला महत्त्व आले आहे. अलीकडे पॅकिंगला खूप महत्त्व आहे. ते कसे चांगले होईल, यावर भर द्यायला हवा. दुधाचे भाव कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडत असते. यामध्ये सातत्य नाही. मात्र सरकारची भूमिका शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याची असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
‘पवार साहेबांनी सवय लावली’
मला पहिल्यापासून सकाळी लवकर कार्यक्रम घेण्याची सवय लागली. बारामतीत तर सहाची वेळ दिली, तरी लोक येतात. आम्हाला पवार साहेबांनी सवय लावली, ती आम्ही टिकवत आहोत, असे ते यावेळी म्हणाले. तर त्या त्या भागातील वातावरणाशी जुळवून घेतील, अशा गाई इकडे आणल्या गेल्यात. वेगळ्या वेगळ्या भागात असे प्रदर्शन भरवू. मला मे शेवटपर्यंत सांगा आपल्याला काय लागणार ते, असे ते यावेळी म्हणाले. निधीची कमतरता असेल तर राज्य सरकार निधी उपलब्ध करून देणार, मात्र गरज असेल तेवढेच मागा, असे अजित पवार म्हणाले.
अधिकाऱ्यांची कानउघडणी
वरती लाल कार्पेट आणि खाली जमिनीची लेव्हल केली नाही. एखाद्या रानात चालतोय असेच वाटत आहे. गोरे गोमटे होण्यासाठी काहीतरी करायचे. बारामतीत या, कसे काम असते बघा, अशी अधिकाऱ्यांची शाळा अजित पवारांनी घेतली. गोठ्यांच्या पाहणीदरम्यान अजित पवारांनी नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांनी कानउघडणी केली.