पुणे : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत (Kolhapur By Election) आमचा उमेदवार विजयी होईल. काँग्रेसचा (Congress)उमेदवार मोठ्या मतांनी निवडून येईल. यात मुख्यमंत्र्यांनी बारकाईने लक्ष दिले, अशी पहिली प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. काँग्रेसचा उमेदवार विजयी होणार, अशी खात्री होती. आघाडीने जो उमेदवार दिला, त्याला शिवसेनेनेही पाठिंबा दिला. मनापासून त्यांनी काम केले. शिवसेनेचे अनेक माजी नगरसेवक तिथे प्रचाराला गेले, असे ते म्हणाले. काँग्रेसतर्फे जयश्री जाधव या रिंगणात असून सध्या त्या आघाडीवर आहेत. जयश्री जाधव विरुद्ध सत्यजीत कदम अशा होणाऱ्या या निवडणुकीत दोन नेत्यांची प्रतीष्ठ पणाला लागली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ही जागा भाजपाच्या गोटात यावी यासाठी पूर्ण जोर लावत आहेत. तर दुसरीकडून कोल्हापूर उत्तरचा गड पुन्हा काबीज करण्यासाठी सतेज पाटील प्रयत्न करत आहेत. राजाराम तलावाशेजारील शासकीय गोदामात ही मतमोजणी पार पडत आहे. आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मंगळवार, 12 एप्रिल रोजी मतदान पार पडले होते. जवळपास 61.19 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव आणि भाजपा उमेदवार सत्यजित कदम यांच्यासह 15 उमेदवार नशीब आजमावत आहेत. पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे या पोटनिवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. 14 टेबलांवर ईव्हीएमवरील मतांची मोजणी सुरू झाली आहे. मतमोजणीच्या एकूण 26 फेऱ्या होतील. यानंतर उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत चिठ्ठ्या काढून पाच ईव्हीएम निवडले जातील आणि त्या मशिनच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजल्या जाणार आहेत.
निवडून येण्याची खात्री वाटते. जवळपास नऊ हजारांपेक्षा अधिकचे लीड झाले आहे. राहिलेल्या फेऱ्यांमध्ये ते लीड वाढतच जाईल. अंतिम निकाल आल्यानंतर माझी प्रतिक्रिया देईल, असे अजित पवार म्हणाले.