पुणे : पुण्यात आज सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत नेत्यांच्या घरासमोर आंदोलन न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारचे आंदोलन हे पोलीस परवानगी घेऊनच होईल, याची खबरदारी आम्ही घेऊ, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही बैठक बोलावली होती. त्यानंतर जगताप बोलत होते. ते पुढे म्हणाले, की जर कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता हा जर सोशल मीडियावर मीम्स (Social media memes) बनवत असेल तर त्याच्या पक्षाच्या प्रमुखांनी त्याला समजावून सांगावे. पुण्याने नेहमीच देशाला आणि राज्याला दिशा दिली आहे. त्यामुळे पुण्यातून कोणताही चुकीचा संदेश (Message) जाणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आम्ही सर्वपक्षीयांनी निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले आहेत.
प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण ते राजकीय चौकटीत असावे. कोणाच्याही व्यंगावर टीका करू नये, असे आजच्या बैठकीत ठरले आहे. यापुढे कोणीही नेत्यांचा कॅन्व्हॉय अडवणार नाही, असे आम्ही ठरवले आहे, असे शिवसेनेचे नेते संजय मोरे म्हणाले आहेत. तसेच कोणत्याही नेत्यांच्या घरांसमोर आंदोलन न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी, भाजपा आणि मनसे या पक्षांतील वाद आणि राजकीय वातावरण तापल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाली.
पुण्यात मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध पक्षांमध्ये विशेषत: राष्ट्रवादी, भाजपा आणि मनसे यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. चार दिवसांपूर्वीच हा संघर्ष भाजपा आणि राष्ट्रवादीत झाला होता. त्या पार्श्वभूमीवर आज वाजता पोलीस आयुक्तांनी बैठक बोलावली होती. या मुख्य पक्षांसह इतर पक्षांनाही या बैठकीचे आमंत्रण देण्यात आले होते. शहराची सध्याची परिस्थिती पाहता कायदा-सुव्यवस्था बिघडू नये. ती अबाधित राहावी, यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी राजकीय पक्षांशी चर्चा केली.