Pune Anand Dave : राज्याचं नाव बदनाम करू नका, हिंदू धर्मात ‘अशा’ परंपरा कधीच नव्हत्या; ‘हेरवाड’वरून आनंद दवेंची सुप्रिया सुळेंवर टीका
कोणा एक दोघांनी असे कृत्य केले असेल, म्हणून ती प्रथा होती असे म्हणणे चुकीचेच आहे. रामायण, महाभारतपासून ते छत्रपतींच्या काळातसुद्धा कोठेही असा उल्लेख आढळून येत नाही, असे आनंद दवे म्हणाले.
पुणे : राज्याचे नाव बदनाम करू नका, हिंदू धर्मात अशा परंपरा कधीच नव्हत्या, असे हिंदु महासभेचे अध्यक्ष आनंद दवे (Pune Anand Dave) यांनी सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हटले आहे. ते पुण्यात बोलत होते. हेरवाड मॉडेल राज्यभर वापरू, असे एका भाषणादरम्यान सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते. विधवा झालेल्या महिलांना सन्मानाने जगण्यासाठी कोल्हापुरातील हेरवाड (Herwad Kolhapur) गावाने विधवा प्रथा बंद करण्याच निर्णय घेतला. महिलेचे मंगळसूत्र काढणे, बांगड्या फोडणे, कुंकू पुसणे आदी अनिष्ठ प्रथा बंद करण्याच निर्णय हेरवाड ग्रामपंचायतीने घेतला. त्याचे स्वागत करून सर्व राज्यात हा उपक्रम राबविला पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यावर आनंद दवे यांनी टीका करत अशा कोणत्याही प्रथा हिंदू धर्मात सक्तीच्या नाहीत, असे म्हणत हिंदू (Hindu) धर्माला बदनाम करू नका असे म्हटले आहे.
काय म्हणाले आनंद दवे?
सुप्रिया सुळेंचा हिंदू धर्मासंबंधिचा हा विचार चुकीचा आहे. त्यांनी ज्या प्रथांबाबत सांगितले आहे, त्या प्रथा हिंदू धर्मात कधीच नव्हत्या. त्यांच्या म्हणण्यातून असा अर्थ निघतो, की आताही राज्यात विधवा प्रथा, केस कापणे या पद्धती चालू आहेत आणि हे मान्य केल्यासारखे आहे. खरे तर कधीच आणि कोठेही अशा प्रथा नव्हत्याच ना सक्ती होती ना सती जाणे हा नियम होता. कोणा एक दोघांनी असे कृत्य केले असेल, म्हणून ती प्रथा होती असे म्हणणे चुकीचेच आहे. रामायण, महाभारतपासून ते छत्रपतींच्या काळातसुद्धा कोठेही असा उल्लेख आढळून येत नाही, असे आनंद दवे म्हणाले.
सुप्रिया सुळेंनी केले होते हेरवाड गावाचे कौकुत
हेरवाड गावाचे उदाहरण सुप्रिया सुळे यांनी एका भाषणादरम्यान दिले. विधवा महिलांना सन्मान देण्याचा निर्णय हेरवाड गावाने घेतला आहे. कोणतेही चांगले कार्य विधवा महिलेच्या हातून करून घेण्याचा निर्णय आदर्श आहे. त्यांनाही समाधानाने, अभिमानाने जगण्याचा अधिकार आहे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. सरकार अशा महिलांना न्याय देईल. नवीन महिला धोरण येत आहे. सामाजिक चौकटीत आपण राहतो. त्यामुळे लोक ही परंपरा समजत होते. आता बदल होत आहे. त्याचे स्वागत केले पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.