“1 जानेवारीपर्यंत वाट बघू, अन्यथा तुरुंगात जायची, सत्याग्रहाचीही तयारी”, बाबा आढाव असं का म्हणाले?, वाचा…
बाबा आढाव यांची सत्याग्रहाची तयारी...

पुणे : “पुण्यात कामगार भवन (Pune Kamgar Bhavan) व्हावं, यासाठी आम्ही आग्रही आहोत. तसंच इतर 12 मागण्यांकडेही सरकारने लक्ष द्यावं. 1 जानेवारीपर्यंत सरकारने निर्णय घेतला नाही तर आपल्याला विचार करावा लागेल. तुरुंगाची वारी आपल्याला करावी लागेल. सत्याग्रहाची तयारी करावी लागेल”, असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील समता चळवळीतील नेते बाबा आढाव (Baba Adhav) यांनी म्हटलंय. ते पुण्यात बोलत होते.
महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृतिदिन आहे. पुण्यातील महात्मा ज्योतिराव फुले वाड्यात स्मृतिदिन साजरा झाला. या कार्यक्रमात बाबा आढाव बोलत होते.
यंदाचा समता पुरस्कार डॉ. यशवंत मनोहर यांना देण्यात आला आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
कामागारांच्या प्रश्नांसाठी बाबा आढाव झगडताना दिसतात. कामागारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कामगार भवन असावं, अशी त्यांची मागणी आहे. मात्र त्यासाठी त्यांना जागा मिळत नसल्यानं बाबा आढाव यांनी आपली खंत बोलून दाखवली.
पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात आलं. पण त्यांच्या विचारांचं काय? भिडे वाड्याचं काय करताय? नावं देऊन फक्त चालणार नाही. तर त्यांच्या विचारांप्रमाणे कृती करावी लागेल. गणपतीला जागा मिळते पण मजूर अड्ड्याला जागा मिळत नाही, असं चालणार नाही, असं बाबा आढाव म्हणालेत.