पुणे : आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत करण्यात आलेल्या अवमानकारक वक्तव्याविरोधात सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात आली असून खासदार उदयनराजे भोसले हे देखील आज या बंदच्या पार्श्वभूमीवर काढण्यात येणाऱ्या मोर्चात सामील होणार आहेत. पुण्यात या बंदच्या पार्श्वभूमीवर मोर्चा देखील काढण्यात येणार असून डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चा निघेल. लाल महाल याठिकाणी मोर्चाचा समारोप केला जाणार आहे. विविध संघटनांनी आजच्या पुणे बंदला पाठिंबाही दिला आहे. दरम्यान, आज सकाळपासून पुण्यातील बंदला नेमका कसा प्रतिसाद मिळतो आहे, याचा आढावा टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधींनी घेतला. यावेळी पुण्यातील मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला.
पुण्यातील मार्केट यार्ड हा परिसर सकाळच्या वेळीस नेहमीच गजबजलेला असतो. शेतकरी व्यापाऱ्यांची मार्केड यार्ड परिसरात मोठी लगबग पाहायला मिळते. पण व्यापारी महासंघाने आणि मार्केड यार्ड व्यवस्थापनाने घेतला असल्यानं काल रात्रीपासून मार्केड यात्र परिसरात शांतता पसरली आहे.
अस्मितेचा अपमान, पुणे बंदमध्ये सहभागी व्हा, असं आवाहनदेखील करण्यात आलं आहे. खासदार अमोल कोल्हे, स्थानिक आमदार, नगरसेवक हे उदयनराजे भोसले यांच्यासोबत बंदच्या पार्श्वभूमीवर काढण्यात येणाऱ्या मोर्चात सामील होण्याची शक्यता आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना हटवा, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली होती.
सर्व पुणेकरांना कळकळीची विनंती…
जय भवानी, जय शिवराय?#Pune #ChhatrapatiShivajiMaharaj pic.twitter.com/OGP6m5YY0Z— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 12, 2022
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यावरुन राज्यपालांविरोधात रोष वाढला होता. त्याच पार्श्वभूमीवर पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळी या बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र या बंदच्या पार्श्वभूमीवर काही प्रमाणात विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम दिसून आला आहे. स्कूल व्हॅन चालकांनी बंदला पाठिंबा दिल्यानं शाळेत मुलांना सोडण्यासाठी पालकांची तारांबळ उडाली. शाळा बंद आहेत की नाही, यावरुन अनेकजण संभ्रमात पडल्याचं दिसून आलं.