उदयनराजेंकडून ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन, आता कार्यकर्त्यांकडून थेट उड्डाणपुलाचं नामकरण
खासदार उदयनराजेंनी ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन केल्यानंतर आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट उड्डाणपुलाचं नामकरण केलंय.
सातारा : राज्यात सध्या औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा वाद चांगलाच पेटलाय. विविध राजकीय पक्षांचे नेते यामध्ये अग्रभागी दिसून येत येतात. इकडे साताऱ्यात मात्र एकापाठोपाठ एक नामकरणांची प्रक्रिया सुरु झालीये. खासदार उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदा ग्रेड सेपरेटरच्या सर्व भुयारी मार्गांना महान व्यक्तींची नावे दिली. आता उदयनराजे समर्थकांनी पुणे बंगळुरु महामार्गावरील सातारा पालिका हद्दीतल्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील उड्डाण पुलाचे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादासाहेब उड्डाणपूल असं नामकरण केलंय. (Pune banglore Highway Fly over udyanraje Supporters Naming)
सातारा पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वत: उदयनराजे आणि त्यांचे समर्थक आक्रमक अंदाजात दिसून येत आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले उदयनराजे काही महिने साईडलाईन झालेले पाहायला मिळाले. मात्र त्यानंतर त्यांना राज्यसभा मिळाली तसंच आता तोंडावर सातारा पालिका निवडणूक देखील आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर उदयनराजे चांगलेच अॅक्टिव्ह झालेले दिसतायत. मागील काही दिवसांपासून साताऱ्यातील विविध विकासकामांचा आढावा घ्यायला त्यांनी सुरुवात केलीय. अशाच पद्धतीने ग्रेड सेपरेटच्या पाहणीचं निमित्त करुन त्यांनी थेट उद्घाटन उरकून टाकलं.
ग्रेड सेपरेटरच्या भुयारी मार्गाच्या चारही प्रवेशद्वारांच्या ठिकाणी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज भुयारी मार्ग, छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) भुयारी मार्ग आणि श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज भुयारी मार्ग अशा नावांचे फलकही लावले गेले.
छत्रपती संभाजी महाराज मार्गाला लावलेला फलक फाटल्याने साताऱ्यात तणाव निर्माण झाला होता. मात्र योग्य वेळी पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे तणाव निवळला. वाऱ्याच्या वेगाने फलक फाटल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला.
सातारा पालिका निवडणुकीच्या निमित्ताने सध्या साताऱ्यात राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. त्यात आता वरचेवर उदयनराजेंच्या आढावा बैठका, विकासकामांची पाहणी यांमुळे पालिका निवडणुकीत रंग भरायला सुरुवात झालीय.
हे ही वाचा