Pune : भोरच्या शिरपेचात मानाचा तुरा, पोरांनी वाढवली तालुक्याची शान, शेतकरी पुत्रांची मोठी भरारी
गावात उनाडक्या करत फिरणाऱ्या पोरांना भरतीचा नाद लागला त्यानंतर पोरांनी घवघवीत यश मिळवत तालुक्याला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली. शेतकऱ्यांची मुलांनी आपल्या गावासह तालुक्याचं नाव मोठं केलंय.
भोर : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील तरूणांनी आपल्या गावासह तालुक्याचं नाव उज्ज्वल केलंय. खानापूर गावचा आकाश थोपटे याची दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र दलात सब-इन्स्पेक्टर (SI), टिटेघर गावचा आदेश निगडे आणि आंबाडे गावचा संकेत खोपडे यांची सीआरपीएफ (CRPF) आणि गुठाळे गावचा वैभव मांढरे याची मुंबई पोलीस दलात निवड झाली. शेतकरी घरातील तरूणांनी घेतलेल्या मेहनतीचं त्यांना फळ मिळालं आहे. यामधील आकाश थोपटे हा भोर तालुक्यातील अशा पदावर जाणारा पहिलाच ठरला आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेतलेली पोरं आता देशसेवेत रुजू होणार आहेत. तालुक्यातील सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.
तालुक्यातील ‘या’ गावांमधील तरूणांची निवड-:
खानापूर गावामधील आकाश थोपटे याची दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र दलामध्ये एसआय या पदावर निवड झाली आहे. गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण राजा रघुनाथ राव विद्यालय, भोर आणि पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयामध्ये पदवीचे शिक्षण घेतलं आहे.
महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत NCC मध्ये असताना आरडीसी 2019 साली दिल्लीमध्ये पथ संचालनाची संधी मिळाली होती. आकाश थोपटे याच्या वडिलांनी 24 वर्षे सीआरपीएफमध्ये सेवा केलीये. त्यानंतर त्याने सलग तीन वर्षे मेहनत घेतली आणि यशाला गवसणी घातली.
13 वीत पठ्ठ्याचे 10 विषय उडलेले
टिटेघर गावचा आदेश निगडे याची सीआरपीएफ (Central Reserve Police Force) मध्ये निवड झाली आहे. गावामधील जिल्हा परिषद शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण आंबवडे या गावामध्ये पूर्ण केलं. बारावी सायन्स शाखेतून पास झाल्यावर गड्याने बीएससीला अॅडमिशन घेतलेलं. मात्र 10 विषयांमध्ये त्याची दांडी गुल झाली. त्यानंतर आदेश याने बीएला प्रवेश घेत NCC केली. तिथूनच त्याच्या जीवनातील खरा टर्निंग पॉइंट ठरला. जर बीएससीला असताना त्याचे विषय गेले नसते तर आज कदाचित हे साध्य झालं नसतं. यावरून एक दिसून येतं की आयुष्यात अपयश आल्यावर खचून न जाता आपले प्रयत्न चालू ठेवायचे. कारण अपयशानंतर आणखी काहीतरी मोठं सक्सेस तुमची वाट पाहत असतं.
गुठाळे गावचा वैभव मांढरेची मुंबई पोलीस दलामध्ये निवड झाली आहे. लहानपणापासूनच त्याचं पोलीस होण्याचं स्वप्न त्याने साकार केलं. त्यासोबतच आंबाडे गावचा संकेत खोपडे याचीसुद्धा सीआरपीएफमध्ये निवड झाली आहे.
दरम्यान, तालुक्यातील पोरांनी या यशासाठी घेतलेली मेहनत त्यांच्या जिवलग मित्रांनी अगदी जवळून पाहिली. त्यामुळे जेव्हा आपल्या दोस्ताची निवड झाल्याचं समजताच गावात त्यांच्या जंगी मिरवणूक काढल्या. आता यश सर्वांना दिसतंय खरं पण पोरांनी तेवढी मेहनतसुद्ध घेतलीय. भरती करत असलेल्या तरूणांसाठी मोठा आदर्श ठरणार आहेत.