पुणे : पुणे मेट्रोचा (Pune metro) वाढता व्याप लक्षात घेता दुसऱ्या टप्प्यावा केंद्र सरकारने (Central government) तत्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी भाजपा खासदार गिरीष बापट (Girish Bapat) यांनी लोकसभेत केली आहे. याचवेळी त्यांनी पहिल्या मेट्रोच्या टप्प्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. पहिल्या टप्प्यात सुरू झालेल्या मेट्रोला पुणेकरांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतू ही सेवा मर्यादित आहे. याचा विस्तार लवकरात लवकर व्हावा, दुसऱ्या टप्प्याच्या कामाला लवकर सुरुवात होण्याची आवश्यकता आहे. यासाठी सरकारने मंजुरी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन झाले. सात मार्चपासून पुण्यातील मेट्रो सेवेचा शुभारंभ झाला. सकाळी आठ ते रात्री नऊ या वेळेत दर अर्ध्या तासाने मेट्रो धावत आहे.
पुण्यातील मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून महाराष्ट्र मेट्रोने दुसऱ्या टप्प्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. याबाबतची माहिती गिरीष बापट यांनी दिली. सध्याच्या 33.1 किमी मेट्रो मार्गाचे काम लवकरच पूर्ण होईल, असे ते म्हणाले. दुसऱ्या टप्प्यातील 82.5 किमी लांबीच्या मार्गाचा विस्तार करण्यासाठी अहवाल तातडीने देण्याची गरज आहे. यात वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, हडपसर ते खराडी, स्वारगेट ते हडपसर, खडकवासला ते स्वारगेट आणि एसएनडीटी ते वारजे आणि पीसीएमसी ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज सर्वेक्षण अहवाल केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे, असे ते म्हणाले.
पुण्यात वाहतूककोंडीने नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यांची, उड्डाणपुलांची कामे त्यात होणारी कोंडी यामुळे गैरसोय होत आहे. अशात मेट्रोमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.