भाजपशी लढण्याआधी ठाकरे गटाच्या एंट्रीमुळे मविआत धुसफूस, पोटनिवडणुकीवरुन राजकारण तापणार?
कसबा पेठ आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतूनच ट्विस्ट येताना दिसतेय. कारण या पोटनिवडणुकीत आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंही उडी घेतली आहे.
पुणे : पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी भाजपचेच आमदार होते. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगतापांच्या निधनामुळं पोटनिवडूक होतेय. पुण्यातील कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीवरुन मविआतच रस्सीखेच सुरु झाली आहे. कारण चिंचवडच्या जागेवर ठाकरे गटानं दावा केलाय. त्यामुळं राष्ट्रवादीची अडचण झालीय. तर कसब्यातून काँग्रेसनं तयारी सुरु केलीय. भाजपशी लढण्याआधी ठाकरे गटाच्या एंट्रीमुळे मविआत कशी धुसफूस सुरु झालीय. पाहुयात त्यावरचा हा रिपोर्ट.
कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतूनच ट्विस्ट येताना दिसतेय. कारण या पोटनिवडणुकीत आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंही उडी घेतलीय. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत, 2 पैकी 1 जागा ठाकरे गट लढवणार, यावर शिक्कामोर्तब झालं.
संजय राऊत यांनी बैठक संपताच चिंचवडच्या जागेसाठी ठाकरे गट आग्रही असल्याचं म्हटलंय. तर कसब्यात काँग्रेस किंवा राष्ट्रवादीनं लढावं, असं ठाकरे गटानं क्लीअर कट संदेश काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिलाय.
विशेष म्हणजे, पुण्यातील कसबा पेठ असो की चिंचवड या दोन्ही ठिकाणी भाजपचेच आमदार होते. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगतापांच्या निधनामुळं पोटनिवडूक होतेय.
कसब्यातून 2019च्या निवडणुकीत भाजपच्या विरोधात काँग्रेसनं उमेदवार दिला होता. काँग्रेसकडून अरविंद शिंदे लढले होते. दरवेळी काँग्रेसचं इथून लढतेय. तर चिंचवडमधून लक्ष्मण जगतापांच्या विरोधात अपक्ष राहुल कलाटेंना राष्ट्रवादीनं पुरस्कृत केलं होतं. मात्र आता ठाकरे गटानं लढण्याची तयारी केल्यानं महाविकास आघाडीतच रस्सीखेच सुरु झालीय.
चिंचवडची जागा जर ठाकरे गटाला गेली. तर राष्ट्रवादीची अडचण होऊ शकते. कारण कसब्यात आतापर्यंत काँग्रेसनंच आपला उमेदवार दिलाय.
काँग्रेस कसब्याच्या जागेवरचा दावा सोडण्यास तयार नाही. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही काँग्रेस सुरु करणार आहे. आता ठाकरे गटानं चिंचवडकडे मोर्चा वळवल्यानं, अजित पवार अॅक्टिव्ह झाले असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फोनवरुन बोलणार आहेत. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठकही होणार आहे.
इकडे चिंचवडच्या जागेवरुन, भाजपचीही बैठक झाली.चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दादांनी लक्ष्मण जगतापांच्या घरी तिकीट देण्याचे संकेत दिलेत.
चिंचवडमध्ये भाजपकडून एक तर लक्ष्मण जगतापांचे भाऊ शंकर जगताप किंवा किंवा लक्ष्मण जगतापांची पत्नी अश्विनी जगतापांना तिकीट मिळण्याचीच शक्यता अधिक आहे. पत्रकार परिषद सुरु असताना, चंद्रकांत पाटलांच्या शेजारी शंकर जगताप आणि अश्विनी जगतापच बसल्या होत्या.
भाजपनं तयारी केली असली तरी बिनविरोधसाठी प्रयत्न करणार असल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही, पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलंय.
भाजपचे बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न असले तरी महाविकास आघाडीतल्या हालचाली पाहता निवडणूक बिनविरोध होईल असं वाटत नाही.