पुणे : कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले होते. दोन्ही मतदार संघाची मतमोजणी सुरु झाली आहे. मतमोजणीच्या पहिली फेरी सकाळी ८.३० वाजेपर्यंत संपणार आहे. त्यामुळे ८.३० वाजेपासून निकाल समजण्यास प्रारंभ होणार आहे. दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत सर्व निकाल येणार आहेत. परंतु निकालानंतर मिरवणूक काढता येणार नाही. पोलिसांनी निकालानंतर मिरवणूक काढण्यास बंदी घातली आहे. तसेच आजपासून दहावी परीक्षाही सुरु होत आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात पोहचण्यास त्रास होऊ नये, म्हणून खबरदारी घेतली जाणार आहे.
कशी होती लढत
कसब्यातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजपचे हेमंत रासने आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यात लढत आहे. कसबा पेठेसाठी मतमोजणी कोरेगाव पार्क येथील धान्य गोदामात होणार आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये एकूण २८ उमेदवार रिंगणात आहे. तरी प्रमुख लढत भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीतील नाना काटे व अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यांत होत आहे.चिंचवडसाठी मतमोजणी थेरगाव येथील शंकरअण्णा गावडे कामगार भवनात होणार आहे.
काय आहे मतमोजणीची व्यवस्था
कसबा पेठ मतमोजणीसाठी १४ टेबल करण्यात आले आहे. मतमोजणीच्या २० फेऱ्या होणार आहे. एका फेरीसाठी सुमारे १५ ते २० मिनिटांचे वेळ लागणार आहे. म्हणजे पहिल्या फेरीचा निकाल सकाळी ८.३० वाजेपर्यंत येणार आहे. दुपारी १२ पर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मतमोजणीत ३७ फेऱ्यांमध्ये निकाल येणार आहे. त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. मतमोजणीच्या दिवशी गावडे कामगार भवन परिसरात जमावबंदीचे आदेश दिले आहे.
कोरेगाव पार्क वाहतुकीत बदल
कोरेगाव पार्क येथील धान्य गोदामात मतमोजणी होणार असल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी या भागातून जाताना या बदलाची नोंद घ्यावी, असे वाहतूक पोलिसांनी कळवले आहे. पिंपरी चिंचवडमध्येही मतमोजणीमुळे गावडे कामगार भवन परिसरात जमावबंदीचे आदेश दिले आहे.