पुणे : पुण्यातल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत मनसेनं भाजपला पाठिंबा दिलाय. या पाठिंब्यावरुन मनसे आणि राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांमध्ये ट्विटरवॉर रंगलंय तर दुसरीकडे मविआचे नेते राज ठाकरेंच्या पाठिंब्यावरुन टीका करु लागले आहेत. पाहूयात हा रिपोर्ट.
कसबा-चिंचवडच्या पोटनिवडणुकीत आता मनसेचीही एन्ट्री झालीय. 5 दिवसांपूर्वी पोटनिवडणुका बिनविरोध करा, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं. मात्र तसं न झाल्यामुळे राज ठाकरेंची मनसे आता भाजपला पाठिंबा देणार आहे. प्रत्यक्ष प्रचार न करता मनसे भाजपसोबत उभी राहणार आहे. पण राज ठाकरेंना भाजपसाठी सभा घेण्याचं आवाहन भाजपच्या बावनकुळेंनी केलंय.
मनसेच्या पाठिंब्यावरुन पुण्याचं राजकारणही तापलंय. कारण कसब्यात काँग्रेसचा उमेदवार आहे. पण राष्ट्रवादीचे समर्थक प्रचारात आघाडीवर राहिले आहेत. त्यामुळे मनसेच्या साईनाथ बाबरांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांवर खोचक टीका केली होती. त्याला प्रशांत जगतापांनी आता उत्तर दिलंय.
मनसेचे साईनाथ बाबर प्रशांत जगतापांना उद्देशून म्हटले होते की लग्न लोकाचं अन् नाचतायत दुसरेच त्यावर आता साईनाथ बाबरांना जगतापांनी उत्तर दिलंय की बाळा शुद्धीवर ये…तुझ्या सायबानं सुपारी घेतली आहे, तू फक्त मन लावून नाचायचं काम कर.
पुण्यात कसब्यासाठी मनसेकडून याआधी गणेश भोकरे इच्छूक होते. सध्या कसब्यात मनसेचा एकही नगरसेवक नाही. 2019 ला कसब्यात लढलेल्या मनसेच्या अजय शिंदेंना 9 हजार मतं मिळाली होती. पण कसब्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं संघटन चांगलं आहे.
कसबा पोटनिवडणुकीत मविआचे रवींद्र धंगेकरांना काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मदत होणाराय. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपच्या हेमंत रासनेंना मनसेचा पाठिंबा असेल तिकडे चिंचवड पोटनिवडणुकीत मनसेकडून कुणीही इच्छूक नव्हतं. गेल्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमध्ये मनसेचा एकच नगरसेवक होता.
2014 मध्ये चिंचवडमधून लढलेल्या मनसेच्या अनंत कोराळेंना ८ हजार मतं मिळाली होती. तर 2014 मध्ये लोकसभेला अपक्ष असणाऱ्या लक्ष्मण जगतापांना मनसेचा पाठिंबा होता. राज ठाकरेंनी त्यासाठीसभाही घेतली होती. विश्लेषकांच्या मते पुण्यात भाजपला पाठिंबा देण्यामागे मनसेची आगामी मुंबई-पुणे-ठाणे महापालिकांची गणितं असू शकतात…तूर्तास पुण्याच्या दोन्ही पोटनिवडणुका रंजक होणार आहेत. मात्र 2019 च्या लोकसभेला नांदेडमध्ये काँग्रेसच्या अशोक चव्हाणांसाठी सभा घेणाऱ्या मनसेवर जी टीका भाजप करत होती. तीच टीका आज मनसेनं भाजपला पाठिंबा दिल्यानंतर मविआ करु लागलीय.