पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचे अपहरण (Abduction) करणाऱ्याच्या मुसक्या पोलिसांनी (Police) आवळल्या आहेत. संबंधित पती पत्नीपासून वेगळा राहतो. आपल्या इतर तीन साथीदारांच्या मदतीने आपल्या पत्नीला कारमधून घेऊन जात असताना चंदननगर (Chandan Nagar) पोलिसांनी त्यांना फलटणजवळ ताब्यात घेतले. अमोल देवराव खोसे (वय 24, रा. रोहिना, ता. परतूर, जि. जालना), महादेव निवृत्ती खानापुरे (वय 22, रा. बामणी, ता. परतूर, जि. जालना) आणि ज्ञानेश्वर बबन पांजगे (वय 25, रा. परतूर, जि. जालना) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 26 वर्षीय महिलेने चंदननगर पोलिसांत फिर्याद दिली आहे. मारवेल झपायर सोसायटीसमोर बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. या आरोपींचा पाठलाग करत चंदननगर पोलिसांनी केवळ सहा तासांच आरोपींना अटक करून महिलेची सुटका केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही पतीपासून वेगळी राहते. काम आटोपून फिर्यादी या घरी जात होत्या. त्या खराडीतल्या मारवेल झपायर सोसायटीसमोर आल्या असता, कारमधून आलेल्या आरोपींनी त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवले. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एकाकडे या महिलेने आपला मोबाइल टाकला तसेच आपल्याला पळवून नेले जात असल्याचे ओरडून सांगितले. त्यानंतर मोबाइल घेणाऱ्या नागरिकाने चंदननगर पोलिसांत धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला.
पोलिसांनी तातडीने महिलेचा शोध सुरू केला. कार फलटणच्या दिशेने जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. चंदननगर पोलिसांचे पथक रवाना होत त्यांनी सहा तासांत आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली. तर महिलेची सुटका केली.