Pune News | पुणे चांदणी चौकात पुन्हा कोट्यवधींचा खर्च, चंद्रशेखर बावनकुळे यांचा भाजप पदाधिकाऱ्यांना इशारा

| Updated on: Sep 22, 2023 | 9:51 AM

Pune Ganesh Utsav | पुणे शहरातील बहुचर्चित चांदणी चौक पुलाचे उद्घाटन मागील महिन्यात झाले. या पुलासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. त्यानंतर वाहतूक कोंडी कमी होईल, ही अपेक्षा होती. परंतु आता पुन्हा खर्च करावा लागणार आहे.

Pune News |  पुणे चांदणी चौकात पुन्हा कोट्यवधींचा खर्च,  चंद्रशेखर बावनकुळे यांचा भाजप पदाधिकाऱ्यांना इशारा
Image Credit source: tv9 Marathi
Follow us on

पुणे | 22 सप्टेंबर 2023 : पुणे शहरात चांदणी चौक पुलाचे उद्घाटन झाले. १८०० कोटी रुपये खर्च करुन पूल बांधला गेला. पुलावरुन वाहतूक सुरु झाली. परंतु पुलामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटली नाही. आता पुन्हा या पुलासाठी मोठा खर्च करावा लागणार आहे. चांदणी चौकातील सुधारणेसाठी आता २५ कोटी रुपये मोजावे लागणार आहे. हा उड्डाणपूल बांधल्यानंतरही पादचाऱ्यांची गैरसोय झाली आहे. पादचाऱ्यांना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून त्या दूर करण्यासाठी आराखडा तयार केला जाणार आहे. त्यामध्ये चार किलोमीटर लांबीचा पादचारी मार्ग निर्माण करणे, पादचारी पूल उभारला जाणार आहे. महापालिका आणि एनएचएआय यांच्यामध्ये संयुक्त बैठकीनंतर अंतिम निर्णय होणार आहे.

काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा घेऊ- बाबनकुळे

भाजपमधील जे पदाधिकारी आपले काम चोख करणार नाहीत, त्यांचा राजीनामा घेऊ, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. भाजपच्या नव्या कार्यकारिणीच्या पहिल्याच बैठकीत बावनकुळे आक्रमक झाले आणि त्यांनी पदाधिकाऱ्यांना थेट इशारा दिला. यावेळी नव्या पदाधिकाऱ्यांना बावनकुळे यांनी शुभेच्छा देत इशाराही दिला. भाजपने मिशन ४५ प्लससाठी रणनिती तयार करण्यावर बैठकीत चर्चा झाली.

नदीच्या प्रवाहात वाहून एकाचा मृत्यू

मावळ तालुक्यात आढे गावात नदी ओलांडत असताना गजानन बोरकर नदीच्या प्रवाहात वाहून गेले. ग्रामस्थांनी वडगाव मावळ पोलिसांना कळविले. त्यानंतर तत्काळ वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांना बोलावून गजानन बोरकर यांचा शोध घेतला. 48 तासांची शोध मोहीम राबवत त्यांचा मृतदेह इंद्रायणी नदीतून काढण्यात आला.

हे सुद्धा वाचा

पिस्तूल बाळगाणाऱ्यास केली अटक

पुणे जिल्ह्यातील खेड येथे गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकास अटक करण्यात आली. गणेश उत्सव सुरु असताना बेकायदेशीर पिस्तूल बाळगून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यासंदर्भात सूचना दिल्या होत्या.

सोयाबीन पीक जोरात

संत तुकोबांच्या देहूतील विठ्ठलवाडीत सोयाबीन पिकांची वाढ जोमाने झाली आहे. आतापर्यंत झालेल्या समाधानकारक पावसामुळे पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनचे उत्पादन विक्रमी येणार आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हवेली कृषी विभागाचे कर्मचारी बांधावर जात आहे. सोयाबीन पीक जोमाने वाढत असल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. सोयाबीनला पुण्याच्या मार्केट यार्डात चांगला भाव मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.