योगेश बोरसे, पुणे | 11 ऑगस्ट 2023 : पुणे शहरातील चांदणी चौक (Chandani chowk) पूल पाडून नवीन पूल बांधण्यात आला. तब्बल चार वर्षानंतर हा पूल आता सुरु होणार आहे. यामुळे पुणेकरांची आता वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. चांदणी चौक उड्डाणपूलासह रस्ते उद्या शनिवारी (ता. १२ ऑगस्ट) वाहतुकीसाठी खुले होणार आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ होणार आहे. कार्यक्रमाची प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे.
नागार्जुन कंस्ट्रक्शन कंपनीने (एनसीसी) पुलाचा व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओतून पुलाची भव्यता दिसत आहे. पुलाचे विहंगम द्दश्य पाहून विदेशातील पुलांची आठवण येत आहे. या पुलामुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडी संपण्यास मदत होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पुलाच्या उद्घघाटनाची चर्चा सुरु होती. आता चांदणी चौक पुलासोबत रस्त्यांचे कामे पूर्ण झाल्यामुळे पुलाचे उद्घाटन होत आहे.
पुणे शहरातील चांदणी चौकातून जुना पूल १९९२ मध्ये बांधण्यात आला होता. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा पूल बांधला होता. चांदणी चौकातून रोज सुमारे दीड लाख जण प्रवास करतात. चांदणी चौकातील पूल आणि रस्त्यांसाठी ३९७ कोटी खर्च आला आहे. पुलाच्या जवळपास १७ किलोमीटर लांबीचे विविध रस्ते तयार केले आहेत. तसेच सर्व्हिस रोडची कामे केली आहेत. मुळशीकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग तयार केला आहे. बावधन ते सातारा आणि वेदभवन ते मुळशी या सेवा रस्ते तयार केले आहे.
पुणे चांदणी चौक पुलाचे विहंगम दृश्य pic.twitter.com/yVb0LLb6h0
— jitendra (@jitendrazavar) August 11, 2023
चांदणी चौकात नवीन पूल बांधण्यासाठी जुना पुल २ ऑक्टोंबर २०२२ रोजी पाडण्यात आला होता. फक्त सहा सेंकदात स्फोटकांच्या साह्याने हा पूल पाडण्यात आला होता. त्यासाठी दीड ते दोन मीटर लांबीचे आणि साधारण 35 मिमी व्यासाचे 1 हजार 300 छिद्र केले गेले होते. सुमारे 600 किलो इमल्शन स्फोटकांचा उपयोग त्यासाठी केला. 1 हजार 350 डिटोनेटरचा वापर करुन स्फोट घडवण्यात आला.