पुणे : शिवसेनेला जनताच पाहून घेईल. सत्तेत आहोत, हे शिवसेना विसरली, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. चंद्रकांत पाटील आज आयुक्तांची भेट घेण्यासाठी महापालिकेत आले होते. यावेळी त्यांनी हनुमान चालिसा, नवनीत राणा या मुद्द्यांवरून शिवसेनेवर (Shivsena) हल्लाबोल केला. नवनीत राणा लीलावती रुग्णालयात दाखल असताना त्यांचा एमआरआय झाला, त्या कक्षातले फोटो समोर आले. यावर शिवसेनेने आक्षेप घेतला. तिथे गोंधळ घातला. तर शिवसेनेच्या या भूमिकेवरून चंद्रकांत पाटील यांनी टीकास्त्र सोडले. लीलावती रुग्णालय (Lilavati hospital) खासगी आहे. तिथे काय करायचे हा रुग्णालय प्रशासन ठरवेल, मात्र शिवसेनेला याचा विसर पडलाय की आपण एक परिपक्व पक्ष आहोत. आपण सत्तेत होतो. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण घ्यावे, असा टोला पाटील यांनी लगावला.
नवनीत राणा यांना उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालिसा वाचायची होती. तेव्हा शिवसेनेने त्यांना त्यावेळी सांगायचे होते. नवनीत राणांच्या घराबाहेर निदर्शने करण्याची काय गरज होती? ते हनुमान चालिसा म्हणणार होतो, रावणचालिसा नाही, असा टोला त्यांनी लगावला. या सर्वांवरून शिवसेना जुन्या मोडमध्ये गेली आहे. दादागिरी सुरू आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. एमआरआय सुरू असते तेव्हा स्टाफही दूर असतो. स्पीकरवर सूचना दिल्या जातात. असे असताना दरवाजा उघडा ठेवला. फोटो काढण्यास परवानगी दिली. हे सर्व गंभीर आहे, असे शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे तसेच किशोरी पेडणेकर पत्रकार परिषदेत म्हणाल्या होत्या.
राज्यात कोणत्याही पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात काहीच अर्थ नाही. तक्रार लिहेपर्यंत चार फोन त्याला येतात. त्यामुळे आता न्यायालय किंवा केंद्र हे दोनच पर्याय उरतात, असे ते म्हणाले. तर 14 तारखेला होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या सभेवर टीका करत 15 तारखेला देवेंद्र फडणवीसांची सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेच्या हिंदुत्वावर त्यांनी हल्ला चढवला. त्यांची सभा होत आहे, म्हणून आमची नाही. तर आमची सभा यावर त्यांनी जोर दिला.