पुणे : पुणे शहराचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनी विक्रम कुमार यांची भेट घेतल्यानंतर पुणे महानगरपालिकेने (PMC) पेठ भागातील पाणीपुरवठा (Water supply) सुरळीत करण्याचे आश्वासन दिले असले, तरी अनेक भागात अजूनही पाणीटंचाई आहे. इतकेच काय, रहिवासी आता या समस्येसाठी 24×7 समन्यायी पाणीपुरवठा योजनेला जबाबदार धरत आहेत. अलीकडे, मध्यवर्ती भागांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे रहिवाशांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्येही 2021पेक्षा कमी पाणी नोंदवले गेले, ज्यामुळे टंचाई निर्माण झाली आणि महापालिकेतील गैरव्यवस्थापन अधोरेखित झाले. पुरेसा पाणीपुरवठा करण्यात अपयश आल्याने प्रचंड नाराजी पसरली असून लोक त्रस्त झाले आहेत. बाहेरून पाणी आणावे लागत असल्याने अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
अर्धा तास पाणी येते. तेही पूर्ण क्षमतेने नाही. त्यासाठी अनेकवेळा मोठ्या इमारतींमधून मजले उतरत यावे लागते. तर अनेक ठिकाणी हे पाणी पुरेसे नसल्याने टँकर बोलवावे लागतात. त्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागतात, असे अनेक ठिकाणच्या रहिवाशांचे मत आहे. काहींनी पाणीपुरवठ्याचे व्यवस्थापन न केल्याचा ठपका अधिकाऱ्यांवर ठेवला. पीएमसीला पुरेसा पाणीपुरवठा करण्यात अपयश आल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आणि निराशा निर्माण झाली आहे.
खासगी पाण्याचे टँकर अवाजवी दरात, नियमबाह्य व निकृष्ट दर्जाचे पाणी खरेदी करून हजारो गृहनिर्माण सोसायट्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत. नागरिकांनी कोविडच्या काळात मालमत्ता कर भरणे सुरूच ठेवले होते आणि पीएमसीने मूलभूत गरजा पुरविण्याचे त्यांचे घटनात्मक कर्तव्य पार पाडावे, अशी अपेक्षा होती, परंतु दुर्दैवाने, सर्व स्तरावरील अक्षम प्रशासन आणि सर्व पक्षांच्या निष्क्रिय राजकीय प्रतिनिधींमुळे आमची निराशा होत आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
मध्यवर्ती भागासह शहराच्या आजूबाजूचा परिसरही पाण्याच्या टंचाईने व्यापला आहे. वानवडी, कोंढवा, वाघोली, वडगावशेरी अशा अनेक ठिकाणी पाण्याच्या समस्या आहेत. आधीच उन्हाळा सुरू झाल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. आता पाण्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागत असल्याने नागरिकांची मात्र कोंडी झाली आहे.