पुणे : विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यामधील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सोशल मीडियावर कोयता गँगचे व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. महत्त्वाचं म्हणजे अल्पवयीन मुलं गुन्हेगारीकडे आकर्षित होत आहेत. पुणे सुरक्षित आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. टोळीयुद्धातील आरोपी दबदबा निर्माण करण्यासाठी दिवसा ढवळ्या खून केल्याच्याही काही घटना समोर आल्या आहेत. अशातच पुण्यातून 31 डिसेंबरच्या रात्री एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुण्यात 31 डिसेंबरला पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. मात्र कर्वेनगर भागातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राहुल कावळे आणि निखिल पाबळे हिंगणे होम कॉलनी या परिसरातून जात होते. त्यावेळी रस्त्यामध्ये एक टोळकं होतं, या टोळक्यामधील एकाने निखिल याच्या कानाखाली लगावली. निखिल याच्या कानाखाली मारल्याने त्याला का मारलं याचा जाब राहुल कावळेने टोळक्याला विचारला. यावेळी झालेल्या बाचाबाचीनंतर टोळक्याने राहुल आणि निखिल या दोघांनाही बेदम मारहाण केली
टोळक्याने दोघांना रस्त्यात मारहाण केल्याने परिसरात दहशत पसरली आहे. या परिसरामध्ये जवळच कमिन्स कॉलेज असल्यामुळे तिथे राहणारे विद्यार्थीही घाबरले आहेत. कर्वेनगर भागात मुलींचे हॉस्टेल्सही मोठ्या प्रमाणात आहेत. बाहेर गावावरून आलेल्या त्यासोबतच बाहेर राज्यातील मुलीही तिथे राहतात. मात्र अशा घटनेमुळे या मुलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं.
दरम्यान, राहुल कावळे आणि निखिल पाबळे यांनी या प्रकरणी वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचा या गुंडांना धाक राहिला नाही की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.