पुण्यात डेंग्यू, मलेरिया आजारांना आळा घालण्यासाठी महापालिका सज्ज, आरोग्य विभागाकडून तपासणी मोहिमेला सुरुवात
पुण्यात डेंग्यू, मलेरिया आजारांना आळा घालण्यासाठी महापालिका सज्ज
पुणे : पुण्यात डेंग्यू (Pune Dengue) , मलेरिया (Pune Malaria) यासारख्या कीटकजन्य आजारांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार शहरात 1 हजार 228 डास उत्पत्ती स्थळे आढळून आली असून त्यांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. त्यापैकी 604 नोटीसा जुलै महिन्यात आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. शहरातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शक प्रणालीनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. डासांच्या माध्यमातून डेंग्यू तसेच चिकुनगुनिया सारखे आजार होत आहेत. कीटकजन्य आजार रोखण्यासाठी ही मोहिम राबविली जात आहे. सोसयाट्या, घरे, गृहसंकुलांची तपासणी पथकाकडून करण्यात येत आहे. नोटीस दिल्यानंतरही योग्य ती कार्यवाही न झाल्यास आणि डासांची उत्पत्ती सुरू राहिल्यास संबंधितांविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार आहे.
फुलदाणी, फ्रिजच्या मागील पाण्याचे ट्रे, कुंड्या, निर्माणाधीन बांधकामे, सरकारी कार्यालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी डेंग्यूचे डास आढळून आले आहेत. या सर्वांना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नोटीस बजाविण्यात आली आहे. शहरात एक जानेवारी 25 जुलै या कालावधीत 195 डेंग्यू रुग्णांची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. त्यातील 52 रुग्ण जुलै महिन्यातील आहेत. नोटीस दिल्यानंतरही योग्य ती कार्यवाही न झाल्यास आणि डासांची उत्पत्ती सुरू राहिल्यास संबंधितांविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे ससून जनरल हॉस्पिटल आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेटच्या मागणीत वाढ झाली आहे. प्लेटलेट्स हे रक्तातील सेल्युलर घटकांपैकी एक आहेत. पांढऱ्या आणि लाल रक्तपेशींसह जे रक्त गोठणे आणि रक्तस्त्राव कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. रक्तपेढ्यांमधील अधिकाऱ्यांनी सांगितले, की दोन रुग्णालयांपैकी प्रत्येकाला आता दररोज किमान 20-25 प्लेटलेट युनिट्सची गरज आहे. डेंग्यूचे प्रमाण वाढण्यापूर्वी ससून 10 ते 15 प्लेटलेट युनिट देत होते आणि वायसीएमएचमध्ये फक्त चार ते पाच युनिटची मागणी होती.