पुणे | 7 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहर आणि जिल्ह्यात मान्सूनचा परतीचा प्रवास पूर्ण झाला आहे. राज्यातील ४५ टक्के भागातून मान्सून परतला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यातही पाऊस परतल्यामुळे ऑक्टोबर हिटचा अनुभव आहे. पुणे शहरातही आता ऑक्टोबर हिटचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. तापमान वाढल्यामुळे पुणेकर घामघूम होत आहे. पुणे आणि राज्यात ऑक्टोबर हिट आणखी वाढणार आहे.
पुणे शहरातून मान्सून परतला आहे. राज्यातील ४५ टक्के भागातून मान्सून परत गेला असून आता उर्वरित दोन दिवसांत संपूर्ण राज्यातून पाऊस जाणार आहे. येत्या दोन दिवसांत राज्यातील अनेक भागातून मान्सून परत जाण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. पुणे शहरातील तापमान ऑक्टोबर हिटमुळे वाढले आहे. आता ३२.४ अंशावर पोहचले आहे. पुण्याप्रमाणे मुंबईतील तापमान वाढले आहे. मुंबईचे तापमान ३२.२ अंशावर पोहचले आहे.
पुणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या १२ ऑक्टोबरपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासात तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. त्यानंतर हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. आता दुपारी ऑक्टोंबर हिटचे चटके जाणवणार असून सध्याकाळनंतर तापमान सामान्य होणार आहे. तसेच पहाटेच्या सत्रात गारवा जाणवेल, असा अंदाज मुंबईच्या हवामान विभागाच्या प्रादेशिक केंद्राने वर्तवला आहे.
कोकण, अरबी समुद्र, विदर्भ, मराठवाड्यातील काही भागातून मान्सून परत गेला आहे. यामुळे राज्यात आता थेट पुढच्या वर्षी मान्सूनची भेट होणार आहे. यंदा मान्सूनने सरासरी गाठली नाही. यामुळे राज्यातील अनेक प्रकल्प पूर्ण भरले नाही. त्याचा परिणाम रब्बी हंगामावर होणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली नाही. जून आणि ऑगस्ट महिन्यात यंदा सर्वात कमी पाऊस झाला. जुलै आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला.