उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, पुण्यातील माजी आमदार करणार जय महाराष्ट्र, तारीख निश्चित
आज महादेव बाबर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पक्षप्रवेशाच्या अनुषंगाने जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या बैठकीला मंत्री उदय सामंत देखील हजर होते.

राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. येत्या काही महिन्यात महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच आता अनेक पक्षांकडून स्वबळावर निवडणुका लढवण्याची चाचपणी सुरु आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनीही जाहीर भाषणात महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले होते. तर दुसरीकडे आता मात्र ठाकरे गटात भूकंपावर भूकंप होताना दिसत आहेत.
पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पुण्याचे माजी आमदार महादेव बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात महादेव बाबर हे शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती समोर आली आहे. आज महादेव बाबर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पक्षप्रवेशाच्या अनुषंगाने जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या बैठकीला मंत्री उदय सामंत देखील हजर होते.
विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नाराज
महादेव बाबर यांच्यासोबत पुण्यातील काही नगरसेवकही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा केला जात आहे. महादेव बाबर यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट देण्यात आले नव्हते. त्यामुळे ते नाराज होते. त्यांना हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. पण महाविकास आघाडीतडून अंतिम क्षणी प्रशांत जगताप यांना उमेदवारी दिल्याने बाबर यांना माघार घ्यावी लागली होती. यामुळेच नाराज झालेल्या महादेव बाबर यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.
अभिषेक वर्मा यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
तर दुसरीकडे अभिषेक वर्मा यांना शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. अभिषेक वर्मा हे एक भारतीय अब्जाधीश आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश झाला. यावेळी भाषण करताना एकनाथ शिंदे यांनी अभिषेक वर्मा यांची तोंडओळख करुन दिली. अभिषेक वर्मा यांचे वडील आणि आई खूप वर्ष खासदार होते. आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या पत्नीनेही पक्षप्रवेश केला. मी तुम्हाला धन्यवाद देतो. त्यांना नॅशनल कोऑर्डिनेटर म्हणून काम करायचे आहे. ते दिल्लीत असतात, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
यानंतर अभिषेक वर्मा यांनीही भाषण केले. “या जगात 120 करोड हिंदू आहेत आणि शिवसेना हा एक पक्ष आहे. जो हिंदुत्वासाठी सनातन धर्माचे रक्षण करू शकतो. मी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालो. एकनाथ शिंदे यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात मुंबईचा झालेला विकास आणि त्यांचं असलेलं लक्ष याला प्रभावित होऊन मी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. निवडणुकीच्या दृष्टीने पक्षप्रवेश केलेला नाही तर विकासाच्या दृष्टिकोनातून हा पक्ष प्रवेश केलेला आहे आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी पक्षात प्रवेश करत आहे”, असे अभिषेक वर्मा यांनी यावेळी सांगितले.