पुणे | 29 सप्टेंबर 2023 : पुणे गणेश विसर्जन मिरवणूक शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास संपली. गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…या जयघोषात पुण्यातील शेवटच्या गणेश मंडळाच्या गणरायाचे विसर्जन झाले. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल, ताशांचे पथकाबरोबर भव्य दिव्य देखावे भाविकांना पाहण्यास मिळाले. महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन या मिरवणुकीतून दिसेल. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी लक्ष्मी रोड आणि टिळक रस्त्यावर अलोट गर्दी झाली होती. परंतु यंदाही विसर्जन मिरवणूक चांगलीच लांबली. यंदा 2905 गणेश मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवला.
पुणे शहरातील विसर्जन मिरवणूक गुरुवारी सकाळी 10.30 वाजता सुरु झाली होती. पुणे शहरातील प्रमुख गणेश मंडळांनी लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्त्यावरून मिरवणूक नेली. मिरवणुकीत ढोल, ताशे, लेझिम पथक, सनई-चौघडा असा लवाजमा होता. गुरुवारी सर्वात आधी पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे विसर्जन झाले. त्यानंतर मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी, मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम, मानाचा चौथा गणपती तुळशीबाग आणि मानचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीचे विसर्जन झाले.
पुणे शहरात मानाचे असलेल्या पाचही गणपतीनंतर सर्वाचे लक्ष दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जनाकडे लागले होते. यंदा प्रथमच मंडळ दुपारी चार वाजताच मिरवणुकीत सहभागी झाले. त्यानंतर पांचाळेश्वर मंदिर घाट येथे रात्री 8.50 वाजता दगडूशेठ गणपती मंडळाच्या गणरायाचे विसर्जन झाले. मंडळाने यंदा फक्त पाच तासांत गणरायाचे विसर्जन केले. मंडळाने महिन्याभरापूर्वीच वेळेत विसर्जन करण्यासाठी दुपारी मिरवणुकीत सहभागी होणार असल्याचा निर्णय जाहीर केला होता.
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक यंदा तब्बल 28 तास 40 मिनिटे चालली. सकाळी 10:30 वाजता विसर्जन मिरवणूक सुरू झाली होती. दुपारी 3:10 वाजता मिरवणूक संपली.