पुणे | 30 सप्टेंबर 2023 : पुणे शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्सव सुरु होता. गणपती बाप्पा मोरया…असा जयघोष सुरु होता. रात्री ८.३० वाजता लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकात गर्दीचा महासागर होता. पाय ठेवण्यास जागा नव्हती. त्यावेळी रुग्णवाहिकेचा सायरनचा आवाज आला. मंडळाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सजगतेमध्ये बदलला. लागलीच रुग्णवाहिकेला जागा करुन देण्यासाठी कार्यकर्त्यांनी हालचाल सुरु केली अन् गर्दीने ओसांडून वाहणाऱ्या रस्त्यावर रुग्णावाहिकेला जागा झाली. मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सजगतेमुळे रुग्ण वेळेवर रुग्णालयात पोहचला.
गणपती चौकाकडून बेलबाग चौकाकडे रुग्णावाहिका येत असल्याचे होनाजी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांना दिसली. कार्यकर्त्यांनी गर्दी बाजूला करत रुग्णवाहिकेला वाट मोकळी करुन दिली. मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून बेलबाग चौकात वाट दिली जात असताना पुढे पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता मोकळा केला. त्यामुळे वेळेवर रुग्ण रुग्णालयात दाखल झाला. पोलीस, मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सजगतेमुळे अलोट गर्दीच्या ठिकाणी हे शक्य झाले.
मंगळवार पेठेत राहणारी २१ वर्षीय तरुणी रुग्णवाहिकेत होती. तिच्या शरीरातील साखर कमी झाल्यामुळे ती बेशुद्ध झाली. तिला तातडीने रुग्णालयात नेणे गरजेचे झाले. या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र आपत्कालीन सेवा विभागाची १०८ क्रमांकाची रुग्णावाहिका घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर मंडळाच्या कार्यकर्ते आणि पोलिसांनी रुग्णावाहिकेला जागा करुन दिली. तरुणीला वेळेत ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. लक्ष्मी रस्त्यावर एका २७ वर्षीय तरुणीला तीव्र वेदना होता होत्या. तिला हालचाल करत येत नव्हती. १०८ रुग्णवाहिकेच्या डॉक्टरांनी तिला सेवा दिली. तिच्या हाडांचे फॅक्चर झाले होते.
विसर्जन मिरवणुकीत १०८ रुग्णवाहिकेने मोठी कामगिरी बजावली. रुग्णवाहिकेच्या माध्यमातून ३९५ जणांवर उपचार करण्यात आले. यामध्ये तीन जणांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. मिरवणुकीसाठी २३ रुग्णवाहिका ठिकठिकाणी तैनात ठेवल्या होत्या. मिरवणुकीत छातीत दुखणे, चक्कर येणे, किरकोळ दुखापती असे रुग्ण आढळले, अशी माहिती विभागीय अधिकारी विठ्ठल बोडखे यांनी दिली.