ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये एका रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Aug 13, 2023 | 3:56 PM

Health Minister Tanaji Sawant on Thane Civil Hospital Death Case : ठाण्यातील हॉस्पिटलमधील 17 रुग्णांचा मृत्यू प्रकरण आणि राज्यातील आरोग्य व्यवस्था; काय म्हणाले आरोग्यमंत्री तानाजी सावंत? वाचा सविस्तर...

ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये एका रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
आरोग्यमंत्री तानाजी सावंत
Image Credit source: Tanaji Sawant FB
Follow us on

ठाणे | 13 ऑगस्ट 2023 : ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रुग्णालयात एकाच रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवस आधीच या रुग्णालयातील पाच रुग्ण दगावले होते. त्यानंतर आज आता ही बातमी समोर आली आहे. त्यामुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. मी सातत्याने या घटनेची माहिती घेत आहे. मी स्वतः तिथल्या आयुक्तांशी बोलत आहे. वैद्यकीय शिक्षण या अंतर्गत ते हॉस्पिटल येतं. तरी सुद्धा इतके रुग्ण दगावणं ही धक्कादायक बाब आहे. कशामुळे ही घटना घडली याचा अहवाल एक दोन दिवसात येईल, असं तानाजी सावंत म्हणालेत.

आयसीयूमध्ये 13 मृत्यू झाले आहेत. तर इतर ४ हे जनरल वार्ड मधील आहेत. ही घटना नेमकी कशामुळे झाली? डीनचं दुर्लक्ष झालं का? हे पाहावं लागेल. पण ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. अहवाल येताच कठोर कारवाई कारवाई होईल, असं आश्वासनही सावंत यांनी दिलं आहे.

ठाण्यातील रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे. याचा मुळापर्यंत आम्ही जाणार आहोत. चौकशी समिती तयार करण्यात आली असून चौकशी अहवाल मागवला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि गिरीश महाजन हे दोघे ही लक्ष ठेऊन आहेत, असंही ते म्हणालेत.

ठाण्यातील रूग्णालयात रूग्ण दगावल्याची माहिती समोर आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. बेशरमपणाची हद्द झाली. माझ्या हातात अधिकार असते तर डीनचे कान लाल केले असते, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्याला उत्तर देताना आज राज्यात रुग्णांचा मृत्यू होतो. याठिकाणी राजकीय भाष्य करणं उचित नाही. दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे, असंही सावंत म्हणाले.

1600 -1700 नवीन डॉक्टरची भरती एमपीएससी आयोगाला दिली आहे. अधिवेशनात आम्ही मोफत उपचाराची घोषणा झाली आहे, असं म्हणत तानाजी सावंत यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेची माहिती दिली आहे. डोळे येण्याची साथ सध्या सुरू आहे.आमच्याकडून पूर्ण तयारी झाली आहे. पथके तयार करून यासंदर्भात मोहीम राबवली जात आहेत, असंही ते म्हणाले.