पालखी मार्गावरील हायवेंवर अवजड वाहतुकीस निर्बंध, वारकरी अपघाताच्या पार्श्वभूमीवर निर्णय
महामार्गावर झालेल्या वारकऱ्यांच्या दिंडी अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आणि पोलीस अधीक्षक (महामार्ग) संजय जाधव यांनी हा निर्णय घेतला आहे.
पुणे : कार्तिकी एकादशीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीला अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील अवजड वाहतूक पहाटे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहाटे चार ते सकाळी आठ वाजेपर्यंत ही जड वाहनांना महामार्गांवर प्रवेश बंद असेल. जुना पुणे-मुंबई महामार्ग, नाशिक महामार्ग आणि सातारा महामार्गासाठी हा निर्णय लागू असेल.
कधीपर्यंत अंमलबजावणी?
सोलापूर रोड आणि कामशेत येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील जड आणि अवजड वाहतूक पहाटे चार ते सकाळी आठ या दरम्यान बंद राहणार आहे. 4 डिसेंबरपर्यंत संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा (कार्तिक वद्य षष्ठी ते अमावस्या) पार होईपर्यंत हा निर्णय लागू असणार आहे.
कोणकोणत्या महामार्गांसाठी निर्बंध?
महामार्गावर झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आणि पोलीस अधीक्षक (महामार्ग) संजय जाधव यांनी हा निर्णय घेतला आहे. जुना पुणे-मुंबई महामार्ग, नाशिक महामार्ग आणि सातारा महामार्गावर सकाळच्या सुमारास अवजड वाहतूक करण्यास बंदी राहील.
वारकऱ्यांच्या दिंडीला अपघात
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून कार्तिकी एकादशीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीला शनिवारी 27 नोव्हेंबर रोजी मोठा अपघात झाला होता. यामध्ये 18 वारकरी जखमी झाले असून दोघा वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सकाळच्या सुमारास हा अपघात झाला होता. खालापूर येथून ही दिंडी आळंदीला पायी निघाली होती, तेव्हा कान्हे फाटा येथे भरधाव पिक अप गाडीने त्यांना धडक दिली होती.
या अपघातात सविता वाळकू येरभ (वय 58), रा. उंबरे, रायगड आणि जयश्री आत्माराम पवार (वय 54), रा. भूतवली, जि रायगड या वारकऱ्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वडगाव-मावळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पिक-अप चालकाला ताब्यात घेतले. खालापूर येथून ही दिंडी आळंदीकडे निघाली होती. जखमी वारकऱ्यांवर कामशेतच्या महावीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी ट्विट करत ‘आळंदीकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीला कामशेत (साते) गावाजवळ वाहनाची जोरदार धडक बसून या दुःखद घटनेत 18 वारकऱ्यांना गंभीर इजा झाली आहेत. जखमी वारकऱ्यांची प्रकृती लवकर बरी होवो ही प्रार्थना. आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करू. नजीकच्या रुग्णालयात त्वरित उपचार सुरू करण्यात आले आहेत’ ही माहिती दिली होती.
संबंधित बातम्या :
कार्तिक संजीवन समाधी सोहळ्याला उत्साहात सुरुवात ; महाराष्ट्रातून वारकरी आळंदीत दाखल
कार्तिकी सोहळयाला पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत घुसला पिकअप; 2 वारकऱ्यांचा मृत्यू , 18 जखमी