पुणे ‘हिट अँड रन’ प्रकरणानंतर शहरात मोठी कारवाई, तब्बल 49 पब आणि बार सील
Pune Accident Case : पुणे अपघात प्रकरणानंतर शहरामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली असून पुणयातील नियमबाह्य पब आणि बार आता सील करण्यात आलेत.
पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर आता इतर पब आणि बार मालकांचे धाबे दणालले आहेत. कारण या अपघातानंतर काही पबमधील व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करण्यात आले होते. त्यामुळे पोलीस यंत्रणेवरही विरोधकांनी गंभीर आरोप केले. आता या अपघात प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील 49 पब आणि बारवर कारवाई
कल्याणीनगर पुणे येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मागील तीन दिवसात 14 पथकांमार्फत राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत शहरातील तसेच जिल्ह्यातील 49 पब आणि बार वर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले असून ते बंद करून सील करण्यात आले आहे.याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी दिली.
ल्याणी नगर येथील अपघातानंतर जवळपास 49 पब आणि बार वर कारवाई करण्यात आली आहे.या घटनेच्या पूर्वी देखील एप्रिल आणि मे महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने 57 पब आणि बार वर कारवाई करण्यात आली होती. तसेच गेल्या वर्षभरात 257 ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.तसेच या कारवाई मध्ये 1 कोटी 12 लाख रुपयांच दंड देखील वसूल करण्यात आलं आहे, असं चरणसिंग राजपूत म्हणाले.
या कारवाई मध्ये पब आणि बार च्या वेळा, तसेच त्यांच्या प्रिमायसेस मध्ये काही बदल केला आहे का? तसेच रफटॉप बाबत आलेल्या तक्रारी, विना परवाना मद्य विक्री करणाऱ्या पब आणि बार वर कारवाई करण्यात येत असून ही कारवाई अशीच पुढे चालू राहणार असल्याचं यावेळी चरणसिंग राजपूत म्हणाले.
दरम्यान, या अपघातामुळे कोरेगाव पार्क परिसरात असे अनेक क्लब असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. तर काही पब हे राजकारणातील नेत्यांच्या वरदहस्ताने सुरू असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. कारण पबमालक हप्ता देत असल्याने त्यांना भीती राहिली नाही, अशी टीकाही उघडपणे काही नेत्यांनी केलीये. मात्र आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा धडाका लावल्याचं दिसत आहे.