पुणे : पुणे येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक प्रदीप कुरुलकर याचे हनी ट्रॅप प्रकरण मे महिन्यात उघड झाले होते. डीआरडीओ सारख्या संस्थेमधील संचालक पाकिस्तानी महिला गुप्तहेरच्या जाळ्यात अडकल्यामुळे खळबळ माजली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासासाठी दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएसची नियुक्ती केली गेली होती. गेली दोन महिने एटीएसने या प्रकरणाची चौकशी केली. प्रदीप कुरुलकर याच्याविरोधात भक्कम पुरावे जमा केले. त्यानंतर आता प्रदीप कुरुलकर विरोधात दोन हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.
हनी ट्रॅप प्रकरणात प्रदीप कुरुलकर याच्या विरोधात दहशतवादी विरोधी पथकाकडून 2000 पानांचे चार्जशीट पुणे न्यायालयात दाखल केले आहे. दोन हजार पानी दोषारोपपत्रात पाकिस्तानी तरुणीच्या हनीट्रॅपमध्ये अडकून देशातील महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप प्रदीप कुरुलकर याच्यावर ठेवला आहे. यासंदर्भात बोलताना वकील विजय फरगडे यांनी सांगितले की, आरोपपत्रात कलम 3 (हेरगिरीसाठी शिक्षा), 4 (विदेशी एजंटशी संप्रेषण) आणि 5 (चुकीचे संप्रेषण) ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट यांचा समावेश आहे.
कुरुलकर याने पाकिस्तानी एजंट झारा दासगुप्ता हिच्याशी संपर्क साधून तिला गोपनीय माहिती दिल्याचा पुरावा एटीएसला मिळाला आहे. देशाची संवेदनशील माहिती पाकिस्तानी एजंटला दिल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. झारा दासगुप्ता या एजंटचा आयपी अॅड्रेस पाकिस्तानमधला असल्याचे तपासात एटीएसला आढळले आहे. तसेच प्रदीप कुरुलकर व्हॉट्सअॅप आणि व्हिडिओ कॉलद्वारे पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात होता.
एटीएसने म्हटले आहे की, प्रदीप कुरुलकर जबाबदार पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्याने आपल्या पदाचा अन् अधिकाराचा गैरवापर केला. संवेदनशील सरकारी माहिती लीक करून त्याने आपली जबाबदारी आणि देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली. महत्वाची माहिती शत्रू राष्ट्राच्या एजंटला दिल्यामुळे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे एटीएसने म्हटले आहे. या प्रकरणात कुरुलकर याला एटीएसने ३ मेला अटक केली होती.