पुणे : राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ासाठी हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पावसामुळे शेतीतील पिकांचं नुकसान होणार आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के.एस. होसालीकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्रात येत्या चार दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. यासाठी IMD द्वारे अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आहे. 15-18 मार्चसाठी हा इशारा दिला आहे.
नागपुरात मंगळवारी सायंकाळच्या वेळी हलक्या स्वरूपाच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली. नागपूर हवामान विभागाने सुद्धा आजपासून पुढे पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे. तसेच दोन दिवस म्हणजे 16 आणि 17 मार्चला गारपीटसह पावसाच्या अंदाज व्यक्त केला आहे. दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट सुद्धा असल्याची माहिती नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एम एम साहू यांनी दिली.तसेच प्रतितास 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
नंदुरबारमध्ये नुकसान
नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील पिके मोठ्या प्रमाणात भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मंगळवारी रात्री नंदुरबार, नवापूर तळोदा आणि शहादा तालुक्याच्या काही भागात अवकाळी पावसासह गारपीट झाली.
14 मार्च: महाराष्ट्रात येत्या 5 दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह, हलक्या ते मध्यम पावसाशी, संबंधित सोसाट्याचा वारा येण्यासाठी IMD द्वारे अलर्ट जारी केला आहे.
काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आहे.
खालील चेतावणी 15-18 मार्च पर्यंत आहेत. आज महाराष्ट्रासाठीही TS इशारा देण्यात आला आहे— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 14, 2023
यामुळे काढण्यासाठी आलेला हरभरा, गहू, मका, ज्वारी यांचे नुकसान झाले. फळबागातील टरबूज, खरबूज, केळी, पपई आणि मिरची पिकाला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. शेतकऱ्यांसोबतच नंदुरबारमधील मिरची व्यापाऱ्यांनाही आवकाळी पावसामुळे मोठा आर्थिक नुकसान सहन करावा लागणार आहे. नंदुरबार बाजार समितीमध्ये खरेदी केलेली मिरची अवकाळी पावसामुळे खराब होणार आहे.
पंचनामे अपूर्ण
एक आठवड्यात दोनदा अवकाळी पाऊस झाला असून पहिल्या पावसाचे पंचनामे पूर्ण होत नाही तेवढाच दुसऱ्यांदा देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुसरीकडे महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी संपावर गेले आहे.
यामुळे शेतकरी आता वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. अवकाळी पावसात पंचनामेनंतरच नुकसान किती झाला आहे याच्या माहिती येणार समजणार आहे. परंतु संपामुळे पंचनामे कधी होणार? हा प्रश्न आहे.