पुणे | 14 ऑगस्ट 2023 : राज्यात पावसाने सध्या सुट्टी घेतली आहे. ऑगस्ट महिना सुरु झाल्यापासून पाऊस नाही. यंदा मान्सून उशिराने दाखल झाल्यानंतर जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. पावासाने जुलै महिन्यात सरासरी गाठली होती. त्यामुळे धरणांमध्ये साठा होऊ लागला होता. पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली होती. पावसाचा असाच जोर ऑगस्ट महिन्यातही कायम राहिल, असा अपेक्षा होती. परंतु ऑगस्ट महिना सुरु होताच पावसाने दडी मारली आहे. यामुळे पाऊस कधी परतणार? हा प्रश्न आहे. आता पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे.
उत्तर भारतातील पावसाचा परिणाम राज्यात दिसणार आहे. IMD मॉडेलनुसार, महाराष्ट्रात 18 ते 24 आणि 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही भागात पावसाचा जोर राहणार आहे. तसेच ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोकण विभागातील काही भागात पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागात सरासरी पाऊस अपेक्षित आहे, पण स्पष्ट नाही. मात्र, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात कोरडे वातावरण राहणार आहे, असे ट्विट पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी केले आहे.
राज्यात कोकणात सध्या हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे. तसेच राज्यातील काही भागांत तुरळक पाऊस होत आहे. परंतु एकंदरीत गेल्या चौदा दिवसांपासून राज्यातील वातावरण कोरडे आहे. कधी काही भागात रिमझिम पाऊस पडतो. जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाला. भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली. यामुळे शेती पिकांना जीवदान मिळाले.
13 Aug, IMD मॉडेल मार्गदर्शनानुसार, महाराष्ट्रात 18 ते 24 आणि 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता, विदर्भातील काही भागात आणि शेजारील, आणि शेवटच्या आठवड्यात कोकण विभागातील काही भागात शक्यता दिसते.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागात सरासरी पाऊस अपेक्षित आहे, पण स्पष्ट नाही. pic.twitter.com/JkPsOdpck4— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 13, 2023
पुणे शहराला पाणी पुरवठा खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांमधून होतो. या धरणांमध्ये जलसाठा समाधानकारक झाला आहे. यामुळे पुणे शहरावर पाणी कपातीचे संकट नाही. परंतु पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. पुणे जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात केवळ ४४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यंदाच्या संपूर्ण पावसाळ्यात पुण्यात ५७० मिलिमीटर पाऊस झाला आहे.