आता छगन भुजबळही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत; कुणी केला भावी मुख्यमंत्री उल्लेख?
Indapur OBC Melava Chhagan Bhujbal Banner as Future Chief Minister : इंदापुरात ओबीसी एल्गार मेळावा होत आहे. या मेळाव्यात छगन भुजबळ यांना भावी मुख्यमंत्री म्हणत बॅनरबाजी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी असे बॅनर पाहायला मिळत आहेत. इंदापुरात होणाऱ्या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष आहे.
सागर सुरवसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, इंदापूर, पुणे | 09 डिसेंबर 2023 : राज्याच्या राजकारणात सध्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद चर्चेत आहे. राज्यातील अनेक वरिष्ठ नेते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. अशातच आता आणखी एक नवा चेहरा मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि शिंदे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांचंही नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर मध्ये आज ओबीसी एल्गार मेळावा होत आहे. या मेळाव्याच्या ठिकाणी छगन भुजबळ भावी मुख्यमंत्री म्हणत बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनर्सची सर्वत्र चर्चा आहे.
भावी मुख्यमंत्री उल्लेख
इंदापुरातील ओबीसी एल्गार मेळाव्यात छगन भुजबळ यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. इंदापूरमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पाहिला ओबीसी एल्गार मेळावा होत आहे. एल्गार मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ थोड्याच वेळात संबोधित करणार आहेत. इंदापुरात सभास्थळी मोठ्याप्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. यात छगन भुजबळ यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे.
इंदापुरात ओबीसी मेळावा
पश्चिम महाराष्ट्रात आज पहिलाच ओबीसींचा एल्गार मेळावा होत आहे. पुण्यातील इंदापूरमध्ये हा मेळावा होतोय. या एल्गार मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ संबोधित करणार आहेत. शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात आज छगन भुजबळ नक्की काय बोलणार याकडे लक्ष आहे. मराठवाड्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात भुजबळ काय बोलतात याकडे लक्ष आहे. या एल्गार मेळाव्याला गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, महादेव जानकर, लक्ष्मण गायकवाड, टी. पी. मुंडे आणि इतर नेते उपस्थित राहणार आहेत.
ओबीसी मेळाव्यात व्यवस्था कशी?
इंदापुरातील ओबीसी एल्गार मेळाव्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. हजारो कार्यकर्ते आज ओबीसी एल्गार मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. 1 टन पोहे, 500 लिटर दूध, 50 हजार पाणी बॉटल आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळच्या नाष्ट्याला पोहे, चहा, दूध तर दुपारच्या सत्रात जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला जेवणाची व्यवस्था केली आहे. सर्वांनी या जेवणाचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे.