छगन भुजबळांबद्दल काहीही बोललं जातंय, वाईट वाटतंय पण…; जयंत पाटील नेमकं काय म्हणाले
Jayant Patil on Chhagan Bhujbal : शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या, पण... असं म्हणत जयंत पाटलांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर...
योगेश बोरसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 08 जानेवारी 2024 : ओबीसी आरक्षणाच्या बाबत अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ठाम भूमिका घेतली आहे. ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला ओारक्षण देऊ नये, असं भुजबळ वारंवार सांगत आहेत. भुजबळांच्या या भूमिकेवर टीकाही केली जात आहे. त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा आज पुण्यातील हडपसरमध्ये मेळावा होत आहे. या मेळाव्यात जयंत पाटील बोलत होते.
भुजबळांबाबत जयंत पाटील म्हणाले…
भुजबळांवर होणाऱ्या टीकेवर जयंत पाटील यांनी भाष्य केलं. सत्तेत असणारे एक आमदार म्हणतात छगन भुजबळांच्या पेकाटात लाथ लागून बाहेर काढा, अशी भाषा वापरली जाते. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावर काही बोलले आपल्याला आठवतं का? भुजबळांबद्दल असं बोललं जातंय आम्हाला वाईट वाटतंय. पण ते बाहेर का पडत नाहीत, हे कळत नाही, असं जयंत पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सवाल
मला खरंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. गृहमंत्री म्हणून ते काहीतरी ठोस कारवाई करतील अशी माझी अपेक्षा होती. ज्या भुजबळांबद्दल एक आमदार काय भाषा वापरतो. पण त्याला मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री काही बोललेत का? की बाबारे तू असं का बोलतोस म्हणून…?, असा थेट सवाल जयंत पाटलांनी विचारला आहे.
तयारीला लागा; जयंत पाटलांच्या सूचना
तुम्ही विचार करा, आपण डोळस असलं पाहिजे. आज या बोर्डाचा पहिला कार्यक्रम आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा. संघटना बांधा, संघटना तळागाळात पोहचवा. आपले शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे राम मंदिरांच्या पायऱ्या चढताना काय काय आठवलं, याची एक कविता लोकसभेत सादर केली. हे भाषण सगळीकडे व्हायरल झालं. आपल्या लोकांची कामं जनतेपर्यंत पोहोचवा, असं जयंत पाटील म्हणाले.
लोकप्रतिनिधींची कामं लोकांपर्यंत पोहोचवा- जयंत पाटील
बुथ कमिट्यावर काम करा. राजकीय दुकानं आता फार झालेली आहेत. थेट स्वयंपाक घरांपर्यंत प्रचार करणाऱ्या दोन चार महिला तरी तुमच्या बुथ कमिटीत पाहिजेत. कार्यकर्त्यांचीही पळवापळवी होऊ म्हणून काही जण बुथ कमिट्याच जाहिर करत नाहीत. हे बरोबर नाही. निवडणूक जिंकायची असेल तर बुथ कमिट्या सक्षम करण्याशिवाय पर्याय नाही, असं जयंत पाटील म्हणाले.