सुनिल ठिगळे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, जुन्नर- पुणे | 19 फेब्रुवारी 2024 : आज 19 फेब्रुवारी… अवघ्या देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. जन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवाई देवी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा शासकीय अभिषेक जिल्हाधिकारी यांच्या हस्ते संपन्न झाला . तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजित पवार यांच्या हस्ते जन्म सोहळा संपन्न झाला. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शासकीय शिवजयंतीला किल्ले शिवनेरीवर फक्त पास धारकांनाचं प्रवेश असणार आहे.
शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी अमोल कोल्हे देखील शिवनेरीवर आले आहेत. यावेळी त्यांच्याशी टीव्ही 9 मराठीने संवाद साधला. शिवजयंतीला राष्ट्रीय सण म्हटला तरी वावगं ठरणार नाही… छत्रपती शिवाजी महाराज यांनी एकही गडावर आपलं नाव कोरलं नाही. तर निमंत्रक पत्रिकेत नाव नाही याचं काही वाटायचं कारण नाही. मी दरवर्षी शिवजयंतीला गडावर पायी जातो. शिवराय म्हणजे आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान… या दिवशी त्यांना अभिवादन करणं हे मी माझं भाग्य अन् कर्तव्य मानतो, असं अमोल कोल्हे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त गेट ऑफ इंडिया इथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुष्पहार घातला. त्यांनी शिवरायांना अभिवादन केलं. यावेळी इकबाल सिंह चहल देखील उपस्थित होते.
सलग दुसऱ्या वर्षी आग्र्याच्या लाल किल्ल्यावर शिवजयंती साजरी होणार आहे. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने विनोद पाटील आग्ऱ्यात साजरी शिवजयंती करणार आहेत. संपूर्ण आग्रा शहरात शिवजयंतीसाठी हजारो बॅनर लावण्यात आले आहेत. 20 बाय 60 आग्र्याच्या लाल किल्ल्यावर स्टेज उभारला आहे. 500 लोक बसण्याची किल्ल्यावर व्यवस्था करण्यात आली आहे. शिवजयंतीसाठी आग्र्याच्या लाल किल्ल्यात रेड कार्पेट टाकण्यात आलं आहे.
औरंगजेबाच्या दरबारात जिथे शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला सुनावले त्याच ऐतिहासिक ठिकाणी शिवजयंती साजरी होणार आहे. शिवजयंतीसाठी ऑनलाइन पद्धतीने 2 कोटी शिवप्रेमी उपस्थित राहणार आहे. आग्र्यातील लाल किल्ल्यासमोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.