Pune Lockdown : ‘मरणं झालं स्वस्त, स्मशानभूमीत लागल्या रांगा, पालकमंत्री साहेब वाचवा’, पुणेकरांची अजितदादांना साद
पुणेकरांनी वैकुंठ स्मशानभूमीसह विविध ठिकाणी फ्लेक्स लावले आहेत. त्यावर "मरणं झालं स्वस्त, स्मशानभूमीत लागल्या रांगा, पालकमंत्री साहेब पुणेकरांना वाचवा- कोरोनाग्रस्त पुणेकर", असं लिहिण्यात आलं आहे.
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना स्थितीही गंभीर बनत चालली आहे. रुग्णसंख्या आणि मृत्यूच्या प्रमाणातही वाढ होत आहे. अशावेळी कोरोनामुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांनी आता पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हाक घातलीय. कोरोनाग्रस्त पुणेकरांनी वैकुंठ स्मशानभूमीसह विविध ठिकाणी फ्लेक्स लावले आहेत. त्यावर “मरणं झालं स्वस्त, स्मशानभूमीत लागल्या रांगा, पालकमंत्री साहेब पुणेकरांना वाचवा- कोरोनाग्रस्त पुणेकर”, असं लिहिण्यात आलं आहे. (Banners in various areas including the cemetery in Pune)
पुण्यातील कोरोना स्थिती बिकट बनली आहे. पुण्यात मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी पुणेकरांनी पालकमंत्री अजित पवार यांना आवाहन केलं आहे. दरम्यान हे बॅनर्स कुणी लावले याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. या बॅनर्सवर ‘कोरोनाग्रस्त पेशंटच्या बेड वरती रेमडेसिव्हीर देणार होतात. कुठे आहेत? पालकमंत्रीसाहेब पुणेकरांना वाचवा’, असंही लिहिण्यात आलं आहे.
अधिकारी, कर्मचाऱ्यांचं एक दिवसाचं वेतन
दुसरीकडे, कोरोनाचा सामना करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला एक दिवसातं वेतन देऊ केलं आहे. या एका दिवसाच्या वेतनातून 1.97 कोटी रुपयांचा निधी उभा केलाय. या निधीतून पुण्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा सामना करण्यासाठी देशातील सर्वोत्तम डॉक्टर्स नियुक्त करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ही माहिती दिलीय.
पुणेकरांसाठी महापालिकेकडून नवी नियमावली
मेस, मद्यविक्री आणि चष्म्याच्या दुकानांना अटींसह परवानगी देण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना आता कोरोना चाचणीचे बंधन नसेल. पुण्यात खानावळींना पार्सल सेवेसाठी परवानगी देण्यात आली आहे. खानावळी आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत पार्सल सेवा देऊ शकतात.
मद्यविक्रीला होम डिलिव्हरी अटीवर परवानगी
पुणे पालिकेने मद्य विक्री करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, फक्त होम डिलिव्हरी करण्याच्या अटीवर ही परवानगी देण्यात आली आहे. नव्या नियमानुसार आता सोमवारी ते शुक्रवार सकाळी 17 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मद्य विकण्यास मुभा असेल.
चष्म्याच्या दुकानांना सुरू ठेवण्यास परवानगी
संचारबंदीच्या काळात मेडिकल, रुग्णालये वगळता इतर बहुतांश बाबींवर बंदी आणण्यात आली होती. यामध्ये चष्म्याची दुकानंसुद्धा बंद करण्यात आली होती. मात्र आता पालिकेच्या नव्या नियमांनुसार चष्याची दुकानं सोमवारी ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. या नव्या नियमांमुळे दृष्टीदोष असलेल्यांना दिलासा मिळाला आहे.
पुण्यात अत्यावश्यक सेवेतील दुकानं बंद राहणार
पुणे जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णांची परिस्थिती पाहता वीकेंड लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवेतील दुकानं बंद राहतील, अशी माहिती पुण्याचे सह. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे. पुण्यात आता शनिवार आणि रविवारी फक्त मेडिकलची दुकान सुरु ठेवण्यास परवानगी आहे.
संबंधित बातम्या :
नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, थेट राज्यपालांकडे मागणी
Video: ज्यानं सुपरमॅनसारखं जाऊन मुलाचे प्राण वाचवले, त्या मयूर शेळकेनं कसं शक्य केलं अशक्य?
Banners in various areas including the cemetery in Pune