पुणे : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे २९ मार्च रोजी निधन झाले. त्यामुळे पुणे लोकसभेची पोटनिवडणूक येत्या सहा महिन्यात होणार आहे. निवडणूक लांब असली तरी राजकीय चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेस पक्ष ही निवडणूक लढवणार असल्याची भूमिका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केली होती. त्यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी त्यांना फटकार लगावला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे.
काय म्हणाले होते अजित पवार
पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. लोकसभेची पोटनिवडणूक पुण्यात बिनविरोध होणार नाही. कारण यापूर्वी पोटनिवडणुकांवेळी भाजपने कुठे आम्हाला बिनविरोध निवडून येऊ दिलं. यामुळे पुणे लोकसभा पोटनिवडणूक आम्ही लढणार आहोत, असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं होते. त्यांच्या या वक्तव्यावर अजित पवार चांगलेच संतापले होते.
पवार यांनी नाराजी व्यक्त करत सांगितले होते की, घाईगर्दीत कोणाला पायात घुंगरु बांधण्याची गरज नाही. गिरीश बापट यांचे निधन होऊन फक्त तीन दिवस झाले आहेत. मानवता नावाची काही गोष्ट आहे की नाही? राज्याच्या राजकारणाची काही परंपरा आहेत. नीतीमूल्य आहेत. या पद्धतीने वक्तव्य करताना महाविकास आघाडीला लाज का वाटत नाही? इतकी असंवेदनशीलता कशाला?
आता जयंत पाटील काय म्हणाले?
अजित पवार यांच्या स्पष्टीकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, बापट साहेबांचे नुकतेच निधन झाले आहे. पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भात आम्ही अद्याप विचार केला नाही. आम्हाला बापटसाहेबांबद्दल आदर आहे. आमचे नेते शरद पवारदेखील त्यादिवशी सर्व कार्यक्रम रद्द करत गिरीश बापट यांच्या अंत्यदर्शनासाठी आले होते. आम्ही अजून पुणे लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केलेली नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
निवडणूक होणार
लोकसभेच्या निवडणुकीला एक वर्षापेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे. यामुळे “राज्यघटनेच्या कलम 243 E आणि U मध्ये स्वच्छ लिहिलं आहे की पाच वर्षांमध्ये निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत.आणीबाणीसारखी किंवा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती असल्यावरच निवडणूक पुढे ढकलता येते. पुणे लोकसभेची तशी परिस्थिती नसल्यामुळे पोटनिवडणूक घ्यावीच लागेल. निवडणूक आयोगाला 151 A कायद्यानुसार पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे, असं मत कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केलं आहे.
हे ही वाचा