पुणे : लोणी काळभोर (Loni Kalbhor) पोलिसांनी (Police) डॉक्टरांकडून पैसे उकळणाऱ्यास अटक (Arrest) केली आहे. परिसरातील दोन डॉक्टरांकडून 30 लाख रुपये उकळल्याप्रकरणी एका 35 वर्षीय तरुणावर ही कारवाई करण्यात आली आहे. मंगेश माणिक कांचन असे आरोपीचे नाव असून तो उरुळी कांचन येथील रहिवासी आहे. त्याला नुकतीच त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. सध्या त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने डॉक्टरांना धमकी दिली, की ते बेकायदेशीर गर्भपात करत आहेत आणि त्यांच्यावर लिंग-केंद्रित गर्भधारणेचे निदान करत असल्याचा आरोप केला. त्यानंतर त्यांच्याकडून 30 लाख रुपयांची खंडणी मागितली. या आरोपीस आता पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यास पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.
या आरोपीवर विमानतळ, हिंजवडी, दौंड, यवत आणि लोणीकंद पोलीस ठाण्यात खंडणी, खुनाचा प्रयत्न, अपहरण, दरोडा, बलात्कार असे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस स्टेशनचे प्रभारी राजेंद्र मोकाशी यांनी दिली आहे. पीडितांकडून खंडणी वसूल करताना सापळा रचून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.