Pune Corona | पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सुरु करणार, महापौरांची माहिती
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत विनामास्क कारवाईतून 28 कोटी रुपये जमा झाले आहेत. (Pune Jumbo Covid Center start again)
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबतची माहिती दिली. नुकतंच पुण्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी याबाबतची माहिती दिली. (Pune Mayor Murlidhar Mohol to start Jumbo Covid Center again)
खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध करुन देण्याच्या सूचना
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळं शहरातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पुणे शहरातील विविध भागात 550 कोविड केअर बेड उपलब्ध आहेत. तर खासगी रुग्णालयात ही बेड उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे आदेश पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
पुणेकरांनी नियमांचं पालन करा
पुण्यातील जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरु करत आहोत. येत्या आठ ते दहा दिवसांत 550 बेड उपलब्ध होतील. आज 55 बेड उपलब्ध होतील. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खासगी हॉस्पिटल चालकांची बैठक आयुक्त घेणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी नियमांचं पालन करावे, असे आवाहन मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.
काळजीची गरज नाही, यंत्रणा सज्ज : आयुक्त विक्रम कुमार
पुण्यात 23 हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी फक्त 2 हजार 300 लोक हॉस्पिटलमध्ये आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत सध्या कोरोनाची लक्षण सौम्य आहेत. गरज पडली तर जम्बो हॉस्पिटलमध्ये 800 बेड उपलब्ध करुन देण्याचीही तयारी आहे. काळजीची गरज नाही, यंत्रणा सज्ज आहे, असे पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले.
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत विनामास्क कारवाईतून 28 कोटी रुपये जमा झाले आहेत. लोकांनी मास्क वापरणं आवश्यक आहे. महापालिका खासगी हॉस्पिटल सोबत बेड उपलब्ध करुन देण्याबाबत सांमजन्स करार करणार आहे. पुण्यातील दीनानाथ हॉस्पिटल, पुना हॉस्पिटल, सिम्बॉयसिस हॉस्पिटल यांसह इतर रुग्णालयासोबत हा करार केला जाणार आहे, असेही विक्रम कुमार यांनी सांगितले.
पुण्यात परिस्थिती काय?
पुण्यात काल दिवसभरात 2900 करोना रुग्णांची नोंद झाली. तर 1245 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. पुण्यात आज दिवसभरात 28 रुग्णांचा मृत्यू झाला. पुण्यात आतापर्यंत 2 लाख 35 हजार 394 रुग्णांना कोरोनाची लागण झालीय. आतापर्यंत 20 लाख 7 हजार 819 रुग्ण बरे झाले आहेत. तर 5 हजार 53 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. पुण्यात सध्या 22 हजार 524 रुग्णांवर उपचार सुरु आहे. (Pune Mayor Murlidhar Mohol to start Jumbo Covid Center again)
संबंधित बातम्या :
Pune Corona update| आशियात महाराष्ट्र, तर पाकिस्तानपेक्षा पुण्यात रुग्णवाढ जास्त
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा उद्रेक, रुग्णांच्या संख्येनुसार झोनची विभागणी