पुणे : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्यांनी जम्बो कोविड सेंटरची काम देण्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. किरीट सोमय्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारले होते. आता पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी देखील संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केलीय. संजय राऊत यांच्यावर मोहोळ यांनी गंभीर आरोप केले आहेत. राऊतांच्या दारात बसणाऱ्यानं मॅनेज करून कंत्राट मिळवल़्याचा आरोप मुरलीधर मोहोळ यांनी केलाय. ज्यांनी कंत्राट घेतलं त्या कंपनीनं पुणेकरांचा जीव घेतल्याचा आरोप मोहोळ यांनी केला आहे. आता मुरलीधर मोहोळ यांच्या आरोपावर संजय राऊत आणि शिवसेना काय प्रत्युत्तर देणार हे पाहावं लागणार आहे. मोहोळ यांच्या आरोपामुळं भाजप विरुद्ध शिवसेना हा पुण्यातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
सर्वज्ञानी संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आणि वास्तवाचं भान हरवलं की असे टेबल न्यूजसारखे आरोप केले जातात. जम्बोचं प्रकरण अंगलट येतंय, याची जाणीव झाल्यावर हे असं दुसऱ्यावर शिंतोडे उडवणे सुरु आहे. खासदार संजय राऊतांची अवस्था भरकटून बुडायला लागलेल्या जहाजासारखी आहे,अशी टीका मोहोळ यांनी केली.
पीएमआरडीए हे राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली येते. खासदार राऊत साहेब तुमच्या दारात नित्यनियमाने बसणाऱ्या त्या व्यक्तिंनी अटीशर्ती मॅनेज करून हे कंत्राट मिळवले आणि त्यांनी पुणेकरांचेच जीव घेतले. त्यानंतर पुणेकरांनी या तुमच्या बहाद्दरांना ब्लॅकलिस्ट करून पुण्यातून हाकलले आहे. पुणेकरांच्या जीवाशी खेळला गेलेला हा काळा धंदा कोणाच्या आशीर्वादाने झाला होता, याचा खुलासा केला तर बरं होईल, असं मुरलीधर मोहोळ म्हणाले.
पुणेकरांच्या जीवाशी खेळला गेलेला हा काळा धंदा कोणाच्या आशीर्वादाने झाला होता, याचा खुलासा केला तर बरं होईल.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) February 27, 2022
शिवसैनिक पुणे महापालिकेतील गैरव्यवहारांची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन भाजप नेते किरीट सोमय्यांना देण्याचा प्रयत्न करत होते. किरीट सोमय्यांच्या यापूर्वीच्या पुणे दौऱ्यात शिवसैनिकांनी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर आले असता शिवसैनिकांकडून सोमय्यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. त्यांनंतर ते प्रकरण गाजलं होतं. भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. आता मुरलीधर मोहोळ यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसैनिक कशी प्रतिक्रिया देणार हे पाहावं लागणार आहे.
इतर बातम्या:
10-15 वर्षे जुन्या कार मालकांना दिलासा, NOC जारी करण्यासह सरकारची नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर