Pune metro : महिनाभरानंतर पुण्याची मेट्रो कशी? उत्पन्न किती? सुविधा काय? वाचा सविस्तर…
6 मार्च रोजी सेवा सुरू झाल्यानंतर पहिल्या 30 दिवसांत सुमारे 6 लाख प्रवाशांनी पुणे (Pune) मेट्रोने (Metro) प्रवास केला आहे. या कालावधीत दोन कार्यरत मेट्रोने एकत्रितपणे 84 लाख रुपयांचे उत्पन्न (Revenue) मिळवले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
पुणे : 6 मार्च रोजी सेवा सुरू झाल्यानंतर पहिल्या 30 दिवसांत सुमारे 6 लाख प्रवाशांनी पुणे मेट्रोने (Pune Metro) प्रवास केला आहे. या कालावधीत दोन कार्यरत मेट्रोने एकत्रितपणे 84 लाख रुपयांचे उत्पन्न (Revenue) मिळवले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मेट्रो सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते 6 मार्च रोजी करण्यात आले. पुणे मेट्रो रेल्वेचा पहिला टप्पा 33.1 किमी लांबीचा असेल आणि त्यात वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन मार्गांचा समावेश असेल. सध्या, मेट्रो या दोन मार्गांवर अंशतः कार्यान्वित आहे – वनाज ते गरवारे कॉलेजपर्यंत 5 किमीची लाइन आणि पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडीपर्यंत 7 किमीची लाFन – दोन मार्गांवर पाच मेट्रो स्टेशन आहेत. या वर्षी डिसेंबरपर्यंत पहिला टप्पा पूर्ण करून संपूर्ण लाइन लोकांसाठी खुली करण्याची योजना आहे.
प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पहिल्या दिवसापासून पुणे मेट्रोला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे, ज्यांनी या सेवेचा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. 6 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत गेल्या 30 दिवसांत सुमारे 6 लाख प्रवाशांनी पुणे मेट्रोने प्रवास केला. तब्बल 75 टक्के प्रवाशांनी वनाझ ते गरवारे कॉलेज या मार्गाने प्रवास केला तर उर्वरित पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी मार्गाने प्रवास केला, अशी माहिती पुणे मेट्रोच्या जनसंपर्क विभागाचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी दिली आहे. 13 मार्च रोजी सर्वाधिक 67,350 प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. त्यादिवशी 10 लाख रुपये उत्पन्न मिळाले.
मोबाइल अॅप्लिकेशनदेखील लॉन्च
पुणे मेट्रोने एक मोबाइल अॅप्लिकेशनदेखील लॉन्च केले आहे, जे नागरिकांना त्यांच्या मोबाइल फोनवर तिकीट बुक करण्यास सक्षम करते आणि याद्वारे सेवेचे अपडेटदेखील ते मिळवू शकतात. या महिन्यात एकूण 20,346 प्रवाशांनी तिकीट बुकिंगसाठी मोबाइल अॅप्लिकेशनचा लाभ घेतला. दरम्यान, महा-मेट्रोनेही शहरातील मार्ग वाढविण्याची तयारी सुरू केली असून, लवकरच त्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम केला जाणार आहे.