पुणे, दिनांक 14 जुलै 2023 : राज्यातील राजकारणात गेल्या पंधर दिवसांपासून मोठे बदल झाले. २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसपासून अजित पवार यांनी आपला वेगळा गट तयार केला. त्यांच्याबरोबर आलेल्या नऊ जणांना मंत्रिपद मिळाले. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्यासोबत ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा केला जात आहे. परंतु त्यातील काही आमदार अजूनही निर्णय घेऊ शकले नाही. त्यांनी तटस्थ राहण्याचा विचार केला आहे. त्यात हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार चेतन तुपे यांचाही समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आमदार चेतन तुपे शरद पवार गटाच्या बैठकीसाठी गेले. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली. म्हणजेच आमदार चेतन तुपे द्विधा मनस्थित असल्याचे दिसून आले. यामुळे याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. परंतु त्यामागे चेतन तुपे यांचे २०२४ च्या विधानसभेचे गणित आहे. चेतन तुपे अजित पवार यांच्या गटात गेल्यास त्यांच्या मतदार संघातील मोठा नेता शरद पवार यांचा गटात येणार आहे.
हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार चेतन तुपे 2019 मध्ये विजयी झाले होते. त्यावेळी त्यांनी भाजप उमेदवार आणि 2014 मध्ये आमदार म्हणून विजयी झालेले योगेश कुंडलिक टिळेकर यांचा पराभव केला. या निवडणुकीत चेतन तुपे यांना 92 हजार 326 मते मिळाली तर योगेश टिळेकर यांना 89 हजार 506 मते मिळाली होती. त्यामुळे थोड्याच मतांनी चेतन तुपे यांचा विजय झाला होता. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे प्रभावी ठरले होते. ते तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना 34 हजार 809 मते मिळाली होती.
चेतन तुपे यांनी अजित पवार यांच्या गटात उडी घेतल्यास मनसे नेते वसंत मोरे यांची शरद पवार गटात एन्ट्री होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी तशी रणनिती तयार केल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली. त्यामुळे चेतन तुपे यांना २०२४ ची निवडणूक अवघड जाईल. म्हणून चेतन तुपे सध्यातरी तटस्थ राहण्याच्या भूमिकेत आहे.